Breaking
महाराष्ट्र

महिलांवरील वाढते बलात्कार रोखण्यासाठी त्यांच्या हातात शस्त्र देणे हा उपाय ठरू शकतो काय ?

0 1 8 5 2 1

महिलांवरील वाढते बलात्कार रोखण्यासाठी त्यांच्या हातात शस्त्र देणे हा उपाय ठरू शकतो काय ?

पुण्यातील स्वारगेट प्रकरणाच्या घटनेमुळे स्त्रीवरील अत्याचाराचा तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुण्यात बुधवारी सकाळी साडेपाच चे दरम्यान घडलेल्या स्वारगेट बस स्थानकावर एका २६ वर्षीय युवतीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर पीडित युवतीने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दत्तात्रय गाडे (३५) नावाच्या आरोपीला गुरुवारी रात्री शिरूर जवळील गुणाट गावात अटक केली आहे. आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे समजते. या घटनेत महत्त्वाची बाब म्हणजे स्वारगेट सारख्या भर वस्तीत असलेल्या बस स्थानकावर सकाळचे वेळी अशी घटना घडते हेच मोठे आश्चर्यकारक आहे. प्रकरणाची रीतसर चौकशी होईल, व सत्य बाहेर येईलच.

मात्र या प्रकरणामुळे पून्हा प्रश्न उद्भवतो तो महिला सुरक्षिततेचा. या ठिकाणी सुरक्षा पथक कार्यरत नाही का ? असल्यास ते गस्त घालत नाही का ? गस्त घालत असल्यास त्यांना संशयास्पद घटना आढळत नाहीत का ? या सर्व बाबींची उत्तरे स्थानकावरील संबंधित अधिकारीच देऊ शकतील व चौकशी दरम्यान या सर्व बाबी समोर येतीलच. परंतु या घटनेमुळे समाजात वावरणाऱ्या अशा अपराधिक व्यक्तींच्या विकृत मनोवृत्तीला बळी पडलेल्या महिलेला भोगाव्या लागणाऱ्या शारीरिक मानसिक व सामाजिक त्रासाचे परिणाम ती पिडीत व्यक्तीच जाणू शकते.

स्त्री अबला नसून सबला आहे, हे वाक्य म्हणण्यासाठी लिहिण्यासाठी किंवा घोषणा देण्यासाठी कितीही चांगले वाटत असले, तरी वास्तविकतेत प्रत्यक्षात वावरताना स्त्रीला मात्र अत्यंत कठीण परिस्थितीशी तोंड द्यावे लागते. समाजातील समाजकंटकांच्या विषारी नजरा, रस्त्यावरील टिकाटिपणी, प्रवासात आंबट शौकिनांच्या किळसवाण्या स्पर्शाचा सामना करीत व त्या पासून स्वतःचा बचाव करीत आपले जीवन कंठावे लागते. नोकरी पेशातील काही स्त्रियांना सुद्धा त्यांच्या नोकरीच्या काही ठिकाणी अशा प्रकारच्या वृत्तीचा कमी अधिक प्रमाणात सामना करावा लागण्याची शक्यता ‌असते. आज आपण कितीही पुढारलेपणाच्या गप्पा हाकीत असलो तरी आज एकट्या स्त्रीचा प्रवास जिकरीचा झाला आहे हे कटू सत्य आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढून समाज सुशिक्षित होत आहे, पण संस्काराच्या बाबतीत समाजाची घसरण होत आहे, अधोगती होत आहे, हे सत्य आहे.

समाजात स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा करताना भगवंता कडून स्त्रीला मिळालेल्या पवित्र कौमार्याच्या देणगीचा गैरफायदा घेऊन विकृत मनोवृत्तीचे पुरुष सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करतात.मात्र स्त्री संरक्षणाची आपलीही जबाबदारी आहे याचा जणू त्यांना विसर पडला आहे. समाज रचनेनूसार स्त्रीच्या बालपणी माता- पित्याने तरूणपणी भावाने, विवाहानंतर पतीने तर वृद्धपणी मुलाने तिचे संरक्षण करावे हे अपेक्षित असते. परंतु प्रत्यक्षात काही ठिकाणी यांचे कडूनच स्त्रीला धोका झाल्याच्या घटना वृत्तपत्राच्या माध्यमातून समोर येत आहेत. काही ठिकाणी स्त्रीला घरगुती हिंसाचाराला बळी पडावे लागल्याच्या घटना ऐकावयास मिळतात. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही काही विकृत वृत्तीच्या व्यक्तीमुळे विद्यार्थिनीचे यौन शोषण झाल्याच्याही घटना उघडकीस आल्या आहेत. विकृत व्यक्तींच्या अशा विकृत मानसिकतेमुळे दहा वर्षाखालील मुलींचेही यौन शोषण झाल्याच्या घटना वाचण्यात आल्या आहेत.म्हणजे घर, शाळा, कुटुंब, रस्ता, व्यवसायाचे ठिकाण, प्रवास, आदी सर्वच ठिकाणी स्त्री मधे असुरक्षिततेची भावना आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मोबाईलच्या युगामुळे आता सायबर गुन्ह्याचाही मोठा धोका उत्पन्न झाला आहे. याद्वारे लुबाडणूक, धमकी देवून पैसे उकळण्या सारख्या गुन्ह्याच्या घटना वाढत आहे. त्यामुळे प्रभावी सायबर सुरक्षा उपायांची ही आवश्यकता आहे.

कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक कायदे व नियम आहेत, जसे हुंडा विरोधी कायदा, घरगुती हिंसाचार संरक्षण कायदा, यौन शोषण पासून संरक्षण कायदा, वगैरेंच्या तरीही गुन्हे घडत असल्याच्या घटना समोर येतच आहेत. त्यामुळे हे कायदे व त्यांची अंमलबजावणी अधिक कठोर पणे करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोच्या २०२४ च्या अहवालानुसार महिलांच्या यौन शोषणा बाबतची परीस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. तर बलात्काराच्या घटनेत २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये १.१ टक्के वाढ दर्शविली आहे. अपहरणाच्या घटना बाबतीत ५.१ टक्क्याने वाढ झालेली आहे. भारताचा अपराधिक दर एक लाख व्यक्तीत ४४५.९ असा आहे. राज्याचे बाबतीत सांगावयाचे झाल्यास उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, व बिहार यांचा अपराधिक दर अधिक आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अपराधाचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या सायबर गुन्ह्याबद्दल अहवालात चिंता व्यक्त केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत १७७ देशात भारताचा १२८ वा नंबर आहे याचा अर्थ सुधारण्याची अत्यंत गरज आहे.

महिला सुरक्षिततेच्या संभाव्य योजना १) यौन शोषण व बलात्कारासारख्या घटनांची गंभीर दखल घेवून युद्धपातळीवर कारवाई करून निर्णय घेण्यात यावे.२) बलात्काऱ्याला फाशी द्यावी. स्त्रीवर अत्याचार करून तिला अपमानास्पद जीवन जगण्यास भाग पाडणाऱ्या नराधमाला कोणतीही दया माया न दाखवता फाशी देण्यात यावी.३) महिलांना व मुलींना शालेय शिक्षणात जूडो कराटेचे प्रशिक्षण तसेच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे काम अत्त्यावश्यक व युद्धपातळीवर करावे.४) बलात्कार पीडित व्यक्तीचे या घटनेमुळे पूर्ण जीवन निराशमय अंधकारमय होते. समाजातील चर्चा व टिका टिपणीमुळे पीडीत व्यक्ती क्षणाक्षणाला मरत असते. तिला जीवन असह्य होवू लागते.यातूनच क्वचित आत्महत्येसारख्या घटनाही घडतात. त्यामुळे बलात्कार सारख्या हीन घटनेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी महिलांना बंदुकीचा परवाना द्यावा. तसेच ती चालविण्याचे प्रशिक्षणही द्यावे. अब्रूचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात तिच्याकडून हत्या झाल्यास ते आत्मसंरक्षण म्हणून तिला माफी द्यावी.५) समाज मनावर सिनेमाचा प्रभाव जास्त पडतो. तेव्हा सिनेमात बलात्कारांच्या दृश्यावर बंदी असावी. सिनेमातील बलात्कारांची दृश्ये म्हणजे स्त्री जातीच्या अब्रूचे एक प्रकारे धिंडवडेच नव्हेत का ? ६) स्त्री संदर्भात घडलेल्या कोणत्याही अपराधाची‌ गंभीरपणे दखल घेवून त्वरित शिक्षेची कारवाई करावी.

समाज जागृती आवश्यक

स्त्री संरक्षण ही केवळ पोलिसांचीच जबाबदारी नाही तर पूर्ण समाजाचीही आहे, याची जाणीव तसेच नजरेसमोर एखाद्या वर हल्ला होत असल्याचे दिसतांना केवळ बघ्याची भूमीका न घेता मदतीला धावून जाण्याची शिकवण समाजाला देणे आवश्यक आहे. समाजात स्त्री सन्मान, स्त्री बद्दल आदराची भावना असणे व ती प्रत्यक्ष आचरणात आणणे याबाबत जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे स्त्रियांनीही काही बाबतीत सावधगीरी बाळगणे आवश्यक आहे. शक्यतो रात्री एकटीने प्रवास करू नये. प्रवासात आपल्या घरच्यांशी लोकेशन शेअर करावी. अनोळखी व्यक्ती सोबत स्वतःची कोणतीही माहिती शेअर करू नये. अनोळखी व्यक्तीला लिफ्ट मागू नये वा स्वीकारूही नये. फेसबुक वर आलेली मैत्रीची कोणतीही विनंती खात्री करूनच स्वीकारावी ताबडतोब स्वीकारू नये.आणी स्वीकारलीच पाहिजे असे नाही. दुर्दैवाने कठीण प्रसंगाला तोंड देण्याचा प्रसंग आलाच तर घाबरून न जाता अत्याचारीच्या डोळा, नाक, व अन्य नाजूक भागावर प्रहार करुन संरक्षणाचा प्रयत्न करावा.

भालचंद्र ठोंबरे, अकोट

98 34 35 0 895

5/5 - (2 votes)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे