महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार

महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार
आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील श्रेष्ठ समाजसुधारक व धर्मचिंतक
ज्योतिबा हे गोविंदराव आणि चिमनाबाई यांचे पुत्र, इ. स.1827 मध्ये पुण्यात त्यांचा जन्म झाला. पण ज्योतिबा एक वर्षाचे असतांनाच त्यांची आई देवाज्ञा झाली, मात्र त्यांच्यावर खरे मातृसंस्कार सगुणाबाईने म्हणजेच गोविंदराव फुले यांची विधवा मावसबहीन यांनी केलेत. तिने पोटच्या लेकराप्रमाणे जपून त्यांच्यावर मानवतावादाचे संस्कार केलेत,म्हणूनच ज्योतिबाच्या वैचारिक घडणीत सगुणाबाई महत्वाच्या आहेत.
इंग्रजी शिक्षणाचा प्रारंभ ही ज्योतिबाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची घटना होय. त्यामुळेच त्यांच्या सम्पूर्ण आयुष्यला कलाटणी मिळाली. त्या शाळेतील उच्चवर्णीय मुलांशी त्यांची मैत्री झाली,नंतर त्यांचे पूर्ण शिक्षण स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळेत झाले तिथेच त्यांच्या विचारात परिपक्वता येत गेली. त्यांच्यावर ख्रिस्ताप्रणित मानवतावादाचा,धर्मपदेशकांच्या जीवनकार्याचा प्रभाव पडला.
थॉमस पेनचे ग्रंथ वाचून 1) Justice and Humanity, 2)Common Sense, 3) Rights ऑफ Man, 4) Age of Reason असे त्यांच्या धार्मिक विचारांनी ज्योतिबा प्रभावित झाले होते,मानवी अधिकार हा शब्दप्रयोग ज्योतिबाच्या लिखाणात वारंवार येतो. गुलामगिरीचा निषेध–मानवतेची प्रतिष्ठा–व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह ही तत्वत्रयी हेच पेन यांच्या समग्र विचारप्रणालीचे अंतः सूत्र होय.
18मे 1988 रोजी मुंबई येथे मांडवीला त्यांच्या कार्याचा गौरव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जाहीर सत्कार घेण्यात आला, त्या प्रसंगी ज्योतिबा यांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल करण्यात आली. ही पदवी मिळालेले महाराष्ट्रीयन महात्मा ज्योतिबा फुले हे पहिलेच आहे.
महात्मा फुले यांचे कार्य
इ. स.1848 मध्ये पुणे शहरी मुलींसाठी शाळा , पण याच दरम्यान त्यांना त्यांची पत्नी सावित्रीबाईची पुरेपूर साथ लाभत होती, म.ज्योतिबांनी सावित्रीबाई ला योग्य ते शिक्षण देऊन अध्यापिका केले पण उच्चवर्णीयांना ते सहन झाले नाही, म. पती-पत्नी वर अनेक दडपण आणण्यात आले, काही काळ शाळा बंद ठेवण्यात आल्या पण सर्व स्थिरस्थावर होईपर्यंत सावित्रीबाईंनी म. ज्योतिबाला सर्व सहन करीत अखंड धैर्याने साथ दिली, पुन्हा पुण्यातच शाळा काढल्यात.
*विधवांच्या केशवपणा विरुद्ध मोहीम—- यासाठी म. फुले जिद्दीने झगडले.
*त्या काळी बालविवाह झाल्यामुळे अनेक तरुण मुली विधवा होऊन त्यांना सक्तीचे वैधव्याचे जीवन जगावे लागायचे, अश्यातच त्या काही वाईट वासनेच्या बळी पडत, पण होणाऱ्या मुलांची हत्या वाढत होती, तर म. फुले यांनी इ. स.1852 मध्ये स्वतः च्या घरावरच बालहत्या प्रतिबंधक गृह ची पाटी लावली आणि सर्व विधवांना मुलीसमान समजून घेऊन त्यांच्या बाळांचे संगोपन चालू केले. त्यातही त्यांना काही लोकहितवादी मित्रांची मदत झाली. फुलेंना मुलबाळ नव्हते,त्यांनी तेव्हाच एका काशीबाई बालविधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्याचे नीट संगोपन-शिक्षण करून त्याचे नावे मृत्यूपत्र सुद्धा करून ठेवले होते.
नंतर…..
*सत्यशोधक विवाहपद्धतीचा पुरष्कार, *पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून कार्य,—अस्पृश्यांसाठी स्वतः ची पाण्याची विहीर देऊन त्यांना साथ देणे,– अनाथ बालिकाश्रम,–*विधवांच्या पुनर्विवाहांचे प्रयत्न,–*मद्यपाणास विरोध,–1852 मध्ये विद्येत मागासलेल्यांसाठी वाचनालय काढले, जातीपातीच्या पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनामुळे इतर कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना काही शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता, तसेच शिक्षण क्षेत्रात अधिक लायक माणसे मिळावीत म्हणून , प्रारंभी शिक्षण हे सक्तीचे व मोफत असावे कारण सर्वशुद्रतीशूद्रांची मुले शिकावीत या सर्व दृष्टिकोनातून म.फुले यांनी हंटर कमिशनरला निवेदन दिले होते.
स्त्रियांच्या दर्जासंबंधीचे म. फुले यांनी चिंतन केलेले दिसून येते सत्सार भाग1-व-2 मध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे की पुरुषांनीच स्त्रियांना त्यांचे हक्क समजू दिले नाहीत, विद्या शिकण्यापासून त्यांना वंचित ठेवले, म्हणून तिला मानवी हक्क उपभोगता आला नाही, ते म्हणतात स्त्री ही कर्तव्यनिष्ठ, मातृत्व जपणारी,योग्य संस्कार जोपासणारी,सहनशील अशी सर्वश्रेष्ठ आई आहे.
*आधी काय, राजकीय की सामाजिक* महाराष्ट्रात गाजलेला हा त्यावेळी महत्वाचा प्रश्न होता,म.फुले यांनी अस्पृश्यतेसंबंधी विचार मांडलेत तसेच प्रत्यक्षात कामही केले, अस्पृश्यांची कैफियत’ हे त्यांचे पुस्तक म्हणजे निष्ठुर अत्याचारांची कहाणीच आहे.
म.फुले यांचे शैक्षणिक विचार प्रभावित करणारे आहेत. शूद्र व अतिशूद्रांना निसत्व व प्रेरणारशून्य जीवनाच्या ठराविक चाकोरीतून बाहेर काढायचे असेल तर धार्मिक,सामाजिक व आर्थिक गुलामगिरीतून त्यांची मुक्तता करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा मार्गच नाही असे त्यांनी राज्यकर्त्यांना सांगितले. तेव्हा सरकार खेड्यातील कष्टकरी जनतेचा शिक्षणाचा प्रश्न गांभीर्याने विचारात घेत नाही असाही त्यांचा आक्षेप होता. व्यवहारज्ञान व व्यावसायिक कौशल्य यांचा आपल्या शिक्षणक्रमात अंतर्भाव झाला पाहिजे व सुशिक्षितांनी योग्य शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्रपणे व्यवसाय करण्याची पात्रता अंगी असायला हवी असे त्यांचे विचार होते.
म.फुले हे कोणी नावाजलेले, व्यासंगी अर्थशास्त्रज्ञ नव्हते तर ते एक कृतिशील समाजसुधारक व समाजचिंतक होते. शेतकऱ्यांचे वास्तव, शेतीच्या मालाच्या विक्रीव्यवस्थेतील उणिवा, अत्यंत सूक्ष्म व वास्तववादी चित्र म.फुले यांनी *शेतकऱ्याचा आसूड* या ग्रंथात रेखाटले आहे.
सार्वजनिक सत्यवर्तनी कोणास म्हणावे यासंबंधी म.फुले यांनी 33 नियम ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकात सांगितले आहे.
धर्मचिंतन हा फुले यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.त्यांच्या वाङ्ममयीन लेखनाचा प्रारंभच मुळी धर्मचिकित्सेतुन झाला. “सार्वजनिक सत्यधर्म” हा त्यांचा शेवटचा ग्रंथही धार्मिक विषयालाच वाहिलेला आहे.
24 सप्टेंबर1873 रोजी म. ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता. पण आपल्यातील महात्मा निघून गेल्यानंतरही सावित्रीबाईंनी मोठ्या हिमतीने व निष्ठेने सत्यशोधक समाजाचे कार्य चालू ठेवले.
इ. स.1869 मध्ये म.ज्योतिबांनी शिवछत्रपती चा पोवाडा प्रसिद्ध केला, अर्वाचीन मराठी साहित्यात शिवछत्रपतींचे पराक्रम व कर्तृत्व याकडे प्रथम लोकांचे लक्ष वेधण्याचे श्रेय म फुले यांच्या पोवाड्यास आहे. महाराजांची बुद्धिमत्ता, चातुर्य, कर्तबगारी,सावधपणा,उदारता, लोकसंग्रह इ.गुणांचे वर्णन म. फुले यांनी अगदी मोजक्या शब्दात रेखीवपणे केले आहे. इतकेच नव्हे तर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड येथील समाधी शोधून त्या समाधीचा जीर्णोद्धार करणारे सुद्धा आपले म.फुले होत.
आपल्या या महामानवाचे विचार आपल्यात आत्मसात करून त्यांना अखंड नतमस्तक होऊया.
वृषाली वानखडे , अमरावती
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨