भंडारा न्यूज : वीज पडून महिला ठार : एसटीची दुचाकीला धडक, चालकाचा मृत्यू
भंडारा : वीज पडून महिला ठार, तीन महिला जखमी
मांगली येथील घटना
भंडारा/E T News
शेतात रोवणी करीत असताना अचानक वीज पडल्याने एका महिला मजुराचा मृत्यू तर तीन महिला जखमी झाल्याची तुमसर तालुक्यातील मांगली/सिहोरा येथे १९ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. चार दिवसांपूर्वी मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे रोवणी करणाºया महिलांवर वीज कोसळली होती. त्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला होता.
अंतकला नेवारे (५०) असे मृत महिलेचे नाव असून नीला कारंडे, विजया शरणागत, शशिकला शरणागत अशी जखमी महिलांची नावे आहेत.
जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्याने धानाच्या रोवणीला गती आली आहे. सगळीकडे रोवणीसाठी महिला मजुरांकडून रोवणीची कामे केली जात आहेत. आज सकाळपासून मांगली येथी शेतशिवारात रोवणी सुरू असताना संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक मजुरांवर वीज कोसळली. यात अंतकला नेवारे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन महिला जखमी झाल्या. हवामान विभागाने जिल्ह्यात रेड अलर्ट दिला असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एसटीची दुचाकीला धडक, चालकाचा मृत्यू
भंडारा/E T News
पवनी तालुक्यातील खापरीकडून पवनीकडे येणाºया बसला विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी धडकल्याने दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापरी-पवनी रोडवरील गायडोंगरी गावाजवळ आज सकाळी घडली.
मृतकाचे नाव नितीन धनराज जांभूळकर (२७) रा. ताडेश्वर वार्ड, पवनी आहे. नितीन हा दुचाकीने पवनीकडून खापरीकडे शेतावर डिझेलची टँक घेऊन जात असताना खापरीकडून पवनीकडे शाळकरी विद्यार्थी घेऊन येत असलेल्या राज्य मंडळांच्या बसला गायडोंगरी गावाजवळ त्याची दुचाकी आदळली. यात नितीन गंभीर जखमी झाला. त्याला बसचे चालक व वाहकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय पवनी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तपास पवनी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रितम येवले करीत आहेत.