आरइटीई बनावट कागदपत्र प्रकरणातील राजा शरीफने केली प्राण्यांच्या शिकारीसह सागवन वृक्षतोड
आरइटीई बनावट कागदपत्र प्रकरणातील राजा शरीफने केली प्राण्यांच्या शिकारीसह सागवन वृक्षतोड
जप्त मोबाईलमध्ये आढळले पुरावे : मध्यप्रदेश प्रशासनाकडे पुरावे सुपूर्द
नागपूर/E T News
आरइटीई बनावट कागदपत्र प्रकरणात अटक असलेला राजा जमशिद शरीफने मध्यप्रदेशात वन्य प्राण्यांची शिकार, सागवन वृक्षतोड केली. तसेच अल्पवयीन मुलीच्या बदनामीकारक चॅटिंगमध्ये त्याचा सहभाग आढळून आला आहे. जप्त मोबाईलमध्ये त्यासंदर्भातील पुरावे सदर पोलिसांना आढळले आहे. हे पुरावे मध्यप्रदेश प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
आरटीई अंतर्गत सदर येथील जिल्हा परिषदेच्या कन्या हायस्कूलमध्ये येथे गट शिक्षण अधिकारी अंतर्गत प्रक्रिया राबविली गेली. प्राप्त अर्जांची पडताळणी केली असता यात उत्पन्नाचे तसेच रहिवासी पुरावे सादर असल्याचे निर्दशनास आले होते. याबाबत गटशिक्षण अधिकारी कवडू रामेश्वरराव दुर्गे (५७) यांनी सदर पोलिसात तक्रार दिली होती. तपासात पोलिसांनी आरोपी प्रशांत गजानन हेडाऊ (३५, रा. अयोध्यानगर, महात्मा गांधी चौक), राजेश शिवपाल बुवाडे (३९, रा. कस्तुरी गार्डन, गोटाळ पांजरी), राजा जमशिद शरीफ (३३, रा. प्लॉट नंबर ३८, अनंतनगर बस स्टॉपजवळ, गिट्टीखदान) यांना अटक केली होती. पोसिांनी राजा शरीफचा मोबाईल जप्त केला होता. त्याची पाहणी केली असता मोबाईलमध्ये वन्यप्राणी बारासिंगा, हरीण, निलगाय या प्राण्यांची शिकार केल्याचे फोटो व चित्रफित आढळल्या. ५० वर्ष जुन्या सागवान झाडांची कटाई केल्याचे चित्रिकरण आढळले. राजा शरीफ व त्याच्या मित्रांनी प्राण्यांची शिकार बरघाट (शिवनी, मध्यप्रदेश) केली. याबबात मध्यप्रदेश येथील फॉरेस्ट विभागाशी पोलिसांनी संपर्क साधला. शनिवारी स्टेट टायगर स्ट्राईक फोर्स युनिट जबलपूर, हेड आॅफिस भोपाल, मध्यप्रदेशचे ए.सी.एफ. व आर.ओ. यांची चमू नागपूरला आले. त्यांना पुरावे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, राजा शरीफ याच्या मोबाईलमध्ये एका अल्पवयीन मुलीबाबत आक्षेपार्ह, बदनामीकारक चॅटिंग केल्याचेही आढळले.
—–