पुरस्काराच्या नावाने कवी, साहित्यिक, लेखकांची आर्थिक लूट : सावध होण्याची गरज

‘पुरस्काराच्या नावाने कवी, साहित्यिक, लेखकांची आर्थिक लूट : सावध होण्याची गरज
नागपूर/विशेष प्रतिनिधी
साहित्यिक, लेखकांनो सावधान, पुरस्कार कुणाला नको असते, ते सर्वांनाच हवेहवेसे वाटते, पुरस्कार मिळाल्यानंतर ती बातमी विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे, बातमी प्रसिद्ध झाल्यावर नावलौकिक मिळवणे व त्यातून मिळणारा एक प्रसिद्धीचा समाधान …! परंतु आता कवी, लेखक, साहित्यिक यांनी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे, अशा व्यक्तींना पुरस्काराचे आमिष देऊन मोठ्या प्रमाणात लुबाडले जात आहे,
अशीच एक घटना विदर्भातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल यांच्या सोबत घडलेली आहे. आळंदी पुणे येथील तेज भूषण संस्थेद्वारा दरवर्षी महाराष्ट्रातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते , लेखक, कवी, पत्रकार व आदींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असतो. राज्यातील काही जिल्ह्यातील विविध मान्यवरांची यामध्ये निवड करण्यात येत असून कार्यक्रमाला सहपरिवारासह निमंत्रण देऊन या पुरस्कार कार्यक्रमासाठी निवड झालेल्या व्यक्तीकडून सहयोग राशी म्हणून ३००० रुपये घेण्यात येत असतात. असे तेजभूषण संस्थेचे अध्यक्षा सौ. तेजस्वीनी भूषण बिऱ्हाडे यांनी कळविले आहे. मात्र अद्यापही मागील दोन वर्षांपासून या पुरस्काराचे वितरण करण्यात आलेले नाही. या संदर्भात त्यांना अनेकदा विचारणा करण्यात आली. मात्र थातूरमातूर उत्तर देण्यात आले. यामुळे पुरस्काराच्या नावाने आर्थिक लुबाडणूक तर होत नाही ना, असा प्रश्न राज्यातील काही लेखक, कवी, साहित्यिक यांना पडतो आहे. सन २०२३-२४ व २४-२५ या कालावधीमध्ये निवड झालेल्या अनेक लेखक, कवी, साहित्यिक यांना अद्यापही पुरस्कार वितरित करण्यात आलेले नाही.
नांदेड येथील संत कबीर समता परिषदेच्या वतीनेही दरवर्षी महाराष्ट्र भूषण व जीवन गौरव पुरस्कार वितरित करण्यात येत असतो. महाराष्ट्रातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते , लेखक, कवी, पत्रकार व आदींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असते. राज्यातील काही जिल्ह्यातील विविध मान्यवरांची यामध्ये निवड करण्यात येत असुन कार्यक्रमाला सहपरिवारासह निमंत्रण देऊन या पुरस्कार कार्यक्रमासाठी पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तीकडून सहयोग राशी म्हणून केवळ २००० रुपये घेण्यात येत असतात. असेही परिषदेचे अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील यांनी कळविले आहे. मात्र आमचे टार्गेट पूर्ण न झाल्याने आम्ही पुरस्कार वितरण रद्द करत असल्याचे त्यांनी कळविले व आपणास पैसे परत मिळेल, अशी ग्वाही दिली मात्र.अजून पर्यंत त्यांनी पैसे परत केले नाही.
मुकुंदराज पाटील आणि तेजस्विनी बिऱ्हाडे यांना पीडित साहित्यिकाने अनेकदा फोन केले व्हाट्सअप वर संपर्क साधला चॅटींग केली, उपरोक्त महोदयांनी बँकेचे डिटेल मागितले, काही ना काही कारण सांगितले, परंतु अद्यापपर्यंत घेतलेले पैसे परत केलेले नाही, आता तर मुकुंदराज पाटील हे Not reachable किंवा फोन उचलत नाही, त्यामुळे अशा व्यक्तींकडून किंवा संघटनेंकडून साहित्यिकांनी सावध व्हावे, असे आवाहन प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल यांनी केले आहे. साहित्यिकांच्या अशा फसवणुकीच्या घटनांमुळे सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
बोगस साहित्यिकांचा सुळसुळाट
पुरस्कार मिळविण्यामध्ये अनेक बोगस साहित्यिकांच्या समावेश असतो, सध्या बोगस साहित्यिकांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात आहे, आयोजकांना असेच बोगस साहित्यिक हवे असतात, जर ते फसले गेले तर ते कुणाकडे काहीच बोलत नाही किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उचलत नाही, त्यामुळे अशा आयोजकांच्या धंदा बिनधास्तपणे सुरू आहे. परंतु जे खरे साहित्यिक असतात तेच या अन्यायाविरुद्ध बोलत असतात, असे एकंदरीत या प्रकरणावरून लक्षात येत आहे. साहित्यिकांनो तुमचे स्वतःचे साहित्य हेच तुमचे खरे पुरस्कार आहे त्यामुळे अशा पुरस्कारामागे धावू नका.