राजेदहेगाव – सावरी रोडवरील अपूर्ण पुलामुळे वाहतूक विस्कळीत
राजेदहेगाव – सावरी रोडवरील अपूर्ण पुलामुळे वाहतूक विस्कळीत
जवाहरनगर/E T News
राजेदहेगाव-सावरी मार्गावरील नाल्यावर पुलियाचे काम गत तीन वर्षांपासून अपूर्ण आहे. या कारणामुळे आणि तात्पुरत्या स्वरूपाचा मातीचा रस्ता वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
स्थानिक आमदारांच्या मर्जीतील कंत्राटदाराला राजेदहेगाव ते सावरी रोड आणि पुलियाचे कामाचे कंत्राट देण्यात आले होते. यापूर्वी, या रोडच्या निकृष्ट कामाबद्दल बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्या होत्या, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
पुलियाचे काम संथगतीने सुरू असून, स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या या दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी परिसरात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे रहदारीसाठी बनविलेल्या मातीचा रस्ता अक्षरशः वाहून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही नागरिक अशाही परिस्थितीत जीव धोक्यात घालून ये-जा करीत आहेत, त्यामुळे अनहोनी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.