सभागृहात दोन्ही बाकांवर बाबासाहेबांचे फोटो : विधानसभेत गदारोळ : दोन्ही बाजुंनी घोषणा

सभागृहात दोन्ही बाकांवर बाबासाहेबांचे फोटो
विधानसभेत गदारोळ : दोन्ही बाजुंनी घोषणा
नागपूर/विशेष प्रतिनिधी
अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक दिसले. कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो त्यांच्या बाकापुढे लावले. यावेळी, विधानसभाध्यक्षांनी त्यांना सभागृहाच्या प्रथा, परंपरेबाबत माहिती दिली. परंतु, विरोधकांकडून फोटो लावण्याला अडचण काय? अशी विचारणा केली असता सत्ताधारी देखील आमच्याकडेही फोटो आहेत. मात्र, ते आत आणले नसल्याचे सांगितले. शब्दाला शब्द वाढत गेले आणि दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली. गोंधळात विधानसभाध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनीटासाठी तहकूब केले.
सभागृहाचे कामकाज शुक्रवारी ११ वाजता सुरू झाले. यावेळी, काँग्रेस सदस्यांकडून बाबासाहेंबांचे फोटो सभागृहात आणले. यावेळ, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी बाकावरील सदस्यांना सभागृहात कुठलीही प्रतीमा, फोटो हे आणता येत नसल्याचे सांगितले. यावेळी, नाना पटोले त्यांची बाजु मांडण्यासाठी उठले, मात्र सत्ताधारी बाकाकडून होणा-या विरोधामुळे त्यांना बोलता येत नव्हते. यावेळी, अध्यक्षांनी दोन्ही बाजुच्या सदस्यांना शांत राहण्याचे सांगितले. परंतु, कुणीही ऐकूण घेण्याच्या तयारीत नव्हते. दरम्यान, अध्यक्षांच्या विनंतीवरून नाना पटोले यांनी बाबासाहेबांचा फोटो काढण्याचे मान्य केले. परंतु, भाजपचे सदस्य घोषणा देत होते. भाजपचे योगेश सागर यांनी काँग्रेसला ढोंगी असल्याचा उल्लेख केला. प्रत्युत्तरात विरोधकांकडूनही उत्तरे दिली गेली. अशातच संतापात सागर हे सभागृहाबाहेर गेले. गोंधळ वाढत असल्याने अध्यक्षांनी कामकाज तहकुब केले. यावेळीही दोन्ही बाकावरून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. दोन्ही बाजू सभागृहाच्या परंपरा व नियमानुसार वागत नसल्याचे दिसल्याने विधानसभाध्यक्षांनी कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळाने सुरळीत कामकाज सुरू झाले.
———-