“आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल” – लव्ह जिहाद’ने घेतला पूजाचा बळी
लव्ह जिहाद’ने घेतला पूजाचा बळी – “आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल” आरोपींच्या धमक्या
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओव्हर गावातील एका सोळा वर्षाच्या तरुणीने गावातील कासिम यासीन पठाण या तरुणाच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी १८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
या प्रकरणात आरोपीच्या अटकेसह त्याच्या संपूर्ण कुटुंबावर गुन्हा नोंदवण्यासाठी घाटी रुग्णालयासह हर्सूल पोलीस ठाण्यात तरुणीच्या कुटुंबीयांनी तसेच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. शेवटी रात्री अकरा वाजता सात जणांवर गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीस अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.
पूजा शिवराज पवार (वय १६ रा. ओव्हर) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्सूल पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी कासिम यासीन पठाण (वय २१) सह त्याचे वडील यासीन सुभान पठाण, चुलते गफ्फार सुभान पठाण, हारून सुभान पठाण, भाऊ राजू यासीन पठाण, चुलत भाऊ जब्बार गफार पठाण आणि इरफान हारून पठाण (सर्व रा. ओव्हर) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
काय आहे हे प्रकरण आपण जाणून घेऊयात?
पूजा अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. दहावीत ९६ टक्के मिळवून उत्तीर्ण झाली होती. नीट परीक्षेच्या तयारीसाठी कोकणवाडीतील एका नामांकित क्लासला ती जात होती. ती कोकणवाडीतील एका वसतिगृहामध्ये राहत होती. सलग सुट्ट्या आणि रक्षाबंधन निमित्त दोन दिवसांपूर्वी गावी आली होती. दरम्यान मागील आठ महिन्यापासून आरोपी कासिम पठाण तिला प्रेम कर म्हणत बळजबरी करत होता. ती गावी आल्याची संधी साधून त्याने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे तणावातून पूजाने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. हा प्रकार तिच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी पूजाला बाहेर काढून घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
कुटुंबीयास धक्का; मृतदेह घेण्यास नकार
या घटनेमुळे मृत तरुणीच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी आरोपीच्या अटकेसाठी घाटीत संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलीस निरीक्षक अतुल येरमे, उपनिरीक्षक गणेश केदार यांनी कारवाईचे आश्वासन देत नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केले. मुख्य आरोपीसह कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा नोंदविण्यासाठी हर्सूल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत जमाव ठाण मांडून होता. आरोपीच्या अटकेसह सात जणांवर गुन्हा नोंदवल्यानंतर नागरिक निघून गेले.
मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी लिहून दिले की कासिम यासीन पठाण हा मुलगा मागील एक वर्षापासून माझ्या मुलीस तिची इच्छा नसताना बोलण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आम्ही त्याच वेळोवेळी समजावून सांगितले होते. माझी मुलगी पूजा ही रक्षाबंधन करिता तिची आई स्वाती पवार हिच्या सोबत छत्रपती संभाजीनगर येथून आमचे ओवरगाव येथील घरी आली होती. १८ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पूजा ही तिची आई स्वाती पवार हिच्या जवळ रडत होती. त्यामुळे स्वातीने पूजाला रडण्याचे कारणाबद्दल विचारपूस केले असता तिने सांगितले की आमच्या गावातील मुलगा कासिम पठाण व त्याच्या घरचे इसम हे मागील काही दिवसापासून माझे हॉस्टेल कोकणवाडी येथील बाहेर येऊन माझ्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. तसेच माझ्या मोबाईलवर कासिम पठाण हा फोन करून भेटण्यासाठी ये नाहीतर मी व माझे घरचे तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकतील अशा धमक्या देत आहे. त्यामुळे मला खूप भीती वाटत आहे. मला आता जगण्याची इच्छा राहिली नाही असे तिने सांगितले. त्यानंतर तिला पत्नी स्वाती, भाऊ सुनील व आई कमलबाई यांनी खूप समजावून सांगितले व तिच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिची भीती जात नव्हती. ती खूप घाबरलेली होती. त्यानंतर अकरा वाजता मी जेवण करण्याकरता बसणार असल्याने पूजाला आवाज दिला तेव्हा ती घरात दिसून आली नाही.
18 ऑगस्ट रोजी नेमके काय घडले?
पूजाला तिच्या कुटुंबीयांनी समजावून सांगितल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जेवणासाठी तिला आवाज दिला, परंतु पूजा तिथे दिसून आली नाही. त्यामुळे स्वाती व घरातील इतर सदस्य पूजाला शोधू लागले. त्यावेळी घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीकडे जाऊन पाहिले असता विहिरीचे पाणी खालीवर होत असल्याने तिच्या आईला संशय आला व तिने आरडा ओरड सुरू केला. तिचा आवाज ऐकून सगळेजण तिथे गोळा झाले व आजूबाजूच्या लोकांनाही बोलावले. तेव्हा दोघा तिघांनी विहिरीत उडी घेऊन पूजाचा शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. पूजाने विहिरीतच उडी मारली असावी असा दाट संशय असल्याने अग्निशमन दलाच्या गाडीला बोलवण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पूजा हिस विहिरीतून बाहेर काढले तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती. त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला लगेच घाटी रुग्णालय येथे दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी पूजाला तपासून मृत घोषित केले.
मुख्य आरोपी कासिम यासीन पठाण हा पूजाला मागील एक वर्षापासून तिची इच्छा नसताना तिच्याशी जवळीकता साधून बोलण्याचा प्रयत्न करत होता. तसेच मानसिक त्रास देत होता. तू माझ्याशी बोलली नाही किंवा माझ्याशी लग्न केले नाही, तर तुला तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकीन व तिचे मोबाईल मधील फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत होता. असा आरोप पूजाच्या वडिलांनी आपल्या फिर्यादीमध्ये केला आहे.
पूजाच्या कुटुंबीयांना आरोपींकडून धमक्या पूजाच्या वडिलांनी फिर्याद दिली असताना पोलिसांनी केवळ दोन आरोपींना अटक केली व उर्वरित पाच आरोपी हे मोकाट असल्यामुळे पूजाच्या कुटुंबीयांना त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. ओवरगावातील आरोपीशी संबंधित एक टोळके पूजाच्या घरासमोर येऊन “आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल” असे बोलून चाकू, तलवार दाखवून धमकी देऊन निघून गेले
पूजा पवार च्या आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगळवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी कासीमसह अन्य एकाला अटक केली आहे. परंतु उर्वरित आरोपींना पोलिसांनी अटक न केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर विजय अवताडे व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी हर्सूल ठाण्याच्या निरीक्षक सुनिता मिसाळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच उपायुक्त नवनीत कावत, सहाय्यक आयुक्त धनंजय पाटील हे देखील उपस्थित होते. पाच प्रमुख मान्य करण्याच्या आश्वासन दिल्यानंतर १२.३० वाजता आंदोलन थांबवण्यात आले.
——————————