पाकिस्तानशी संबंधित सोशल मीडिया पोस्टपासून दूर राहा : सरकारचे आवाहन

पाकिस्तानशी संबंधित सोशल मीडिया पोस्टपासून दूर राहा : सरकारचे आवाहन
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या परसरवल्या जात आहेत. इतकेच नाही तर भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांसंबधीचे बनावट व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चुकीचे दावे केले जात आहेत.या खोट्या बातम्यांपासून देशातील नागरिकांनी सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे.
भारत देश आपला आहे..सर्व भारतीयांनी एकजूट राहण्याची व सरकारच्या धोरणात्मक निर्णयाला पाठिंबा देण्याची गरज आहे..सर्व विरोधी पक्षांनी भारत सरकारला व भारताच्या सैन्याला पाठिंबा दिलेला आहे..हा देशाच्या हिताचा प्रश्न आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याने पाकिस्तान हादरले आहे. पाकिस्तानने क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि लढाऊ विमानांनी भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑपरेशन सिंदूरपासून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहितीचा पूर आला आहे. काही माहिती अचूक आहे, काही अतिशयोक्तीपूर्ण आहे आणि काही पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे.
सोशल मीडिया खोट्या दाव्यांनी भरलेला असेल
पीआयबी फॅक्ट चेकने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले: येत्या काळात तुमचे सोशल मीडिया पाकिस्तान प्रायोजित प्रचाराने भरलेले असेल. सर्व माहिती काळजीपूर्वक तपासणे महत्वाचे आहे.
या पोस्टमध्ये, सरकारने जनतेला फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर पसरवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहण्यास सांगितले आहे, विशेषतः भारतीय सैन्याशी किंवा भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीशी संबंधित माहितीपासून.
सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की जर त्यांना कोणतीही संशयास्पद माहिती आढळली तर त्यांनी त्वरित पीआयबी फॅक्ट चेकला कळवावे. यासाठी तुम्ही +91 8799711259 वर WhatsApp पाठवू शकता आणि factcheck@pib.gov.in वर ईमेल करू शकता.
देशात लष्करी कारवाया सुरू असताना आणि सीमेवर तणाव असताना, सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणे हा एक मोठा धोका बनू शकतो. सरकारच्या इशाऱ्याला गांभीर्याने घेत, प्रत्येक नागरिकाने सोशल मीडियावरील सत्य आणि असत्य ओळखावे आणि संशयास्पद माहिती त्वरित पीआयबी फॅक्ट चेकला कळवावी.
पाकिस्तान सारख्या नापाक देशाला भारत सरकार जोरदार प्रत्युत्तर देत आहे..एवढेच नव्हे तर देशातील मुस्लिम बांधवांचा पाठिंबा देखील मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कोणीही देशविरोधी वक्तव्य करून भारताची बाजू कमजोर करू नये..हा देशाच्या प्रतिष्ठेचा व देश हिताचा प्रश्न आहे.
दोन्ही देशांमधील तणावाच्या काळात एखादी माहिती शेअर करण्यापूर्वी सामान्य नागरिकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या याबद्दल देखील सरकारने माहिती दिली आहे
केवळ अधिकृत मार्गदर्शक सूचना, मदत क्रमांक संपर्क आणि मदतीविषयीची पडताळून पाहिलेली माहिती सामायिक करा.
कोणतीही बातमी सामायिक करण्यापूर्वी त्याची अधिकृत स्त्रोतांद्वारे तथ्य पडताळणी करा.
खोट्या बातम्यांविषयी तात्काळ तक्रार करा
सैन्य दलांच्या हालचाली विषयीची माहिती सामायिक करू नका.
पडताळून पाहिली नसलेली माहिती कोणालाही पुढे पाठवू नका.
हिंसा अथवा सामाजिक तणाव निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील अशा पोस्ट टाळा.
प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
————-




