खोदकामात सापडला सोन्याच्या माळांनी भरलेला हंडा !
खोदकामात सापडला सोन्याच्या माळांनी भरलेला हंडा !
* आमिषाला बळी पडला भाजी विक्रेता : 3 लाखाने फसवणूक
* नकली माळा देत आरोपी पसार : दोघांवर गुन्हा दाखल
नागपूर/ E T News
खोदकामात सोन्याच्या माळांनी भरलेला हंडा मिळाला असून ठेकेदाराला कळले तर तो यातील काहीही देणार नाही, म्हणून तो विकायचा आहे, असे दोन मजूरांनी सांगितल्यानंतर भाजी विक्रेत्याला मोह आवरला नाही. त्याने खरेदीची तयारी दाखविली. ३ लाखांत सोन्यांच्या माळा खरेदी केल्या. सोनाराकडे दाखविल्यावर ते नकली असल्याचे समजले. तोवर मात्र, वेळ निघून गेली होती.
अमरावती येथील वार्ड क्रमांक १, नांदगाव, खंडेश्वर येथे फिर्यादी शुभांगी गुल्हाने (३७) आणि त्याचे पती सुरेश गुल्हाने राहतात. सुरेश यांचे भाजी विक्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुकानात असताना २३ जुलै रोजी, रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांचे दुकानात दोन व्यक्ती आले. ते मजुरीचे काम करत असल्याचे सांगितले. ते राजापेठ येथे खोदकाम करत असताना त्यांना सोन्याच्या माळ असलेला हंडा मिळाल्याचे सांगितले. परंतु, याबाबत ठेकेदाराला कळल्यास यातील आम्हाला काहीही मिळणार नाही. शिवाय घरी लग्न असल्याने त्या माळा विक्री करायचे असल्याची बतावणी केली. आरोपींच्या सांगण्यावर सुरेश यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी दोन सोन्याचे मनी दिले. फोन नंबर दिला आणि घ्यायचे असल्यास संपर्क करण्यास सांगितले. आरोपींनी या सोन्याच्या माळ ५ ते ७ लाख रुपयांमध्ये विक्रीची तयारी दाखविली आणि निघून गेले. काही दिवसांनी सुरेश यांनी आरोपींना फोन केला. तेव्हा ठेकेदाराने कामासाठी नागपूरला आणल्याचे सांगत लवकरात-लवकर सोने घेऊन जा असे म्हटले. ३० जुलैला दुपारी २ वाजता शुभंगी, सुरेश नागपूरला आले. कॉटन मार्के ट येथे थांबले. आरोपींनी त्यांना एका ज्वेलर्सलगत असलेल्या हनुमान मंदिरात आणले. यावेळी, दोन आरोपींसह एक महिला देखील होती. त्यांनी लाल कापडात बांधलेल्या सोन्यांच्या मण्यांची माळ दाखविल्या. ३ लाखांत सौदा झाला. पैसे आणि मणींची देवानघेवण झाल्यानंतर आरोपींनी गुल्हाने यांना येथे सीसीटीव्ही कॅमेरे लागले असयाने अधिक वेळ न थांबता परत जाण्यास सांगितले. शुभांगी आणि सुरेश घरी आले. पाच दिवसानंतर ते सोन्यांच्या माळा सोनाराकडे घेऊन गेले असता त्या नकली असल्याचे कळले. आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर प्राप्त तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
—————————–