शनिवारी (१३ जुलै) अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियातील प्रचार सभेत ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळेस झाडलेल्या गोळ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेल्या. या गोळीबारात प्रचार सभेतील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दोनजण गंभीररित्या जखमी झाले.
ट्म्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे 2024 च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचार मोहिमेला धक्का बसला आहे.
या हल्ल्यामुळे अमेरिकेतील सामाजिक आणि सांस्कृतिक सलोख्याला छेद गेला आहे. मागील अनेक दशकांपासून अमेरिकेच्या राजकारणातील सुरक्षा आणि सुरक्षिततेबद्दल निर्माण झालेला भ्रम या घटनेमुळे नाट्यमयरित्या दूर सारला गेला आहे.
या हल्ल्यात ट्रम्प यांना किरकोळ जखमा झाल्या, मात्र ते थोडक्यात बचावले.1981 मध्ये रोनाल्ड रेगन यांच्यावर जॉन हिंकले याने गोळी झाडली होती. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर अशी प्रकारचा नाट्यमय हल्ला झालेला नाही. त्या घटनेला आता 43 वर्षं होतायत.
ट्रम्प यांच्यावरील हल्ला अमेरिकेच्या इतिहासातील काळ्या क्षणांची आठवण करून देतो. त्यावेळेस एक राष्ट्राध्यक्ष आणि एक राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार हल्लेखोरांच्या गोळ्यांनी मृत्यूमुखी पडले होते.
मेडगर ईवार्स, मार्टिन लुथर किंग ज्युनियर आणि माल्कम एक्स या सर्वांना देखील राजकीय हिंसाचारात आपला जीव गमवावा लागला होता.
आजच्या सारखंच, 1960 च्या दशकात देखील जेव्हा बंदूकीचा वापर करण्यास इच्छूक असलेली व्यक्ती इतिहासाला कलाटणी देऊ शकत होती, अमेरिकेत राजकीय ध्रुवीकरण झालं होतं, व्यवस्था ढेपाळली होती.