नागपूर /E T News
अति विश्वास हा हमखास घातकच ठरत असतो, याची प्रचिती वाडी भागात आली. मालकाने टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत एका नोकराने चक्क एका ट्रान्सपोर्ट कंपनीला 44 लाख रुपयांनी चुना लावला.
प्रकरण असे की, वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाव्हा येथे बालाजी गोल्डन नावाची ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. आंबेडकरनगर येथील रहिवासी मनोज मोहनलाल शवकानी (48) हे या कंपनीचे मालक आहेत.
मुरलीधर मालचंद आसोपा ( 38 ) हा या कंपनीचा नोकर आहे. तो राजस्थानच्या बिकानेर येथील रहिवासी असून वाडी भागात भाड्याने राहतो.
या मालकाला नोकरावर मोठा विश्वास असल्याने त्याने कंपनीच्या बँक खात्याचे सर्व व्यवहार आणि लेनदेन त्याच्याकडे सोपवली होती.
25 मे ते 26 जून 2024 दरम्यान त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीतील रजिस्टरमध्ये बनावट नोंदी घेवून स्वतःचे खात्यावर तसेच ईतर खात्यावर एकूण 43 लाख 54 हजार 653 रूपये ट्रान्सफर करून मालक व कंपनीचा विश्वासघात करून फसवणूक केली.
मालकाने पैसे परत करण्याचा तकादा लावला असता आरोपीने शिरजोरी करीत मालकालाच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मालकाच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. उपनिरीक्षक उत्तम जायभाये हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.