शेकडो बेरोजगार युवकांचा बुद्धा कंपनीवर धडकला एल्गार मोर्चा : परप्रांतीयांना रोजगार, स्थानिक मात्र बेकार !

शेकडो बेरोजगार युवकांचा बुद्धा कंपनीवर धडकला एल्गार मोर्चा : परप्रांतीयांना रोजगार, स्थानिक मात्र बेकार !
श्री बुद्धा कंपनीने स्थानिक बेरोजगार युवकांना डावलले
बाहेरील युवकांना दिल्या जात आहे रोजगार….
(रंगराव कुळसंगे )
राजुरा : वेकोलिच्या गोवरी_पोवनी खुल्या कोळसा खाणीत दोन महिन्यापासून कार्यरत असलेल्या श्री बुद्धा माती कंपनीने स्थानिक बेरोजगार युवकांना काम देण्याऐवजी बाहेरील व्यक्तींना नोकरीत सामावून घेतल्याने शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख तथा एच. एम. एस.कामगार युनियनचे महामंत्री बबन उरकुडे व गोवरीच्या सरपंच आशा उरकुडे यांच्या नेतृत्वात सोमवारी (दि.३) १ वाजताच्या सुमारास एल्गार मोर्चा श्री बुद्धा कंपनीवर धडकला.यात शेकडो बेरोजगार युवक व नागरिक सहभागी झाले होते.
राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या गोवरी _पोवनी खुल्या कोळसा खाणीत माती व कोळसा काढण्याचे काम करणाऱ्या श्री बुद्धा कंपनीने स्थानिक बेरोजगार युवकांना काम न देता बाहेरील लोकांचा भरणा केला आहे.त्यामुळे कंपनी जवळील गावातील स्थानिक युवक बेरोजगार आहे. त्यामुळे कंपनीने स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य द्यावे, कंपनीने चरित्र पडताळणी प्रमाणपत्र असल्याशिवाय कामगारांना कामावर घेऊ नये,ज्यांचेकडे चरित्र पडताळणी प्रमाणपत्र नाही आशा कामगारांची हकालपट्टी करावी, गोवरी ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय कंपनीने कोणतेही काम करी नये,कंपनीने बाहेरील व्यक्तीला रोजगार देऊ नये,कंपनीने केलेली कोणतीही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही,कामगारांसाठी आवश्यक सोई सुविधा पुरवाव्यात, वेकोलिने अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला व नोकरी मिळाल्याशिवाय कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणतेही खोदकाम करू नये यासारख्या विविध मागण्यांसाठी शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख तथा एच. एम. एस.कामगार युनियनचे महामंत्री बबन उरकुडे व गोवरीच्या सरपंच आशा बबन उरकुडे यांचे नेतृत्वात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास महामिनरल गुप्ता कोल वॉशरिज पासून पायदळ श्री बुद्धा माती कंपनीवर एल्गार मोर्चा काढण्यात आला.यावेळी या मोर्चात शेकडो बेरोजगार युवक सहभागी झाले होते. त्यानंतर एचएमएस युनियनचे महामंत्री बबन उरकुडे व मान्यवरांनी मोर्चाला संबोधित केले. त्यानंतर श्री बुद्धा कंपनी व्यवस्थापनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सात दिवसांचे आत कंपनी व्यवस्थापनाने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.त्यांनतर मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी महिलांचे भजन व पारंपरिक भुसाळी नृत्य या मोर्चाचे आकर्षण ठरले. एल्गार मोर्चात एच. एम.एसचे नेते आर. आर. यादव, संग्राम सिंग,वणी येथील शिवसेना(उबाठा)तालुका समन्वयक आयुश ठाकरे, तालुका संघटक बबलू कुशवाह,बंडू आईलवार,शंकर पारखी,रमेश आस्वले, सत्यपाल गेडाम ,मुठरा येथील सरपंच करिष्मा बोबडे,सुवर्णा लांडे ,विनोद साळवे, मनोज कुरवटकर,भीमराव मिटूवार,अमोल कोसुरकर,राजू लोणारे प्रवीण मोरे यांचेसह शेकडो बेरोजगार युवक व नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी सहभागी झाले होते.
जमीन आमची, रोजगार मात्र परप्रांतीयांना….
वेकोलीच्या गोवरी_पोवनी खुल्या कोळसा खाणीत दोन महिन्यापासून कार्यरत असलेल्या श्री बुद्धा माती कंपनीने स्थानिक बेरोजगार युवकांना डावलून बाहेरील व्यक्तीला रोजगार दिला आहे.कोणत्याही उद्योगात ८० टक्के स्थानिक लोकांना रोजगार देणे आवश्यक असते.मात्र श्री बुद्धा कंपनीने बाहेरील लोकांना काम दिल्याने स्थानिक युवक बेरोजगार आहेत.गावाजवळ कंपनी असल्याने परिसरातील गावकऱ्यांना ब्लास्टिंगचे धक्के सहन करावे लागतात.कोळसा खाणीतून उडणाऱ्या प्रदूषणाचा सामना करावा लागतो.मात्र रोजगार बाहेरील युवकांना दिल्या जात असल्याने स्थानिक बेरोजगार युवक संतप्त झाले आहेत.