कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाचे आंदोलन
(राजुरा तालुका प्रतिनिधी – रंगराव कुळसंगे)
* कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाचे आंदोलन
* ठेकेदारी कामगारांना बोनससह त्यांचे हक्क व सुरक्षा देण्याची मागणी
राजुरा/E T News
वेकोलीचे कोळसा खाण कामगार व ठेकेदारी कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय खदान मजदूर संघाने आंदोलनाचा बिगुल फुंकला असून आंदोलनाची घोषणा केली आहे. भारतीय कोयला ख.म.संघातर्फे दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी बल्लारपूर क्षेत्रीय महाव्यवस्थापक कार्यालयावर धरणा प्रदर्शन होणार असून दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी वेकोलिच्या नागपूर मुख्यालयावर विशाल धरणे आंदोलन होणार आहे. यासंदर्भात येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बीकेकेएमएस चे केंद्रीय महामंत्री सुधीर घुरडे, संघटनेच्या वर्धा व्हॅलीचे महामंत्री अनिल निब्रड महामंत्री, उपाध्यक्ष हनुमंंतू भंडारी, मंत्री श्रीनिवास कोपूला, क्षेत्रीय कल्याण समिती सदस्य प्रविण मुनगंटीवार, समय्या येलुकापल्ली,पांडुरंग नंदूरकर उपस्थित होते.
भा.को.ख.म.संघाने कोल इंडिया संबंधित सर्व कंपन्यांमध्ये सदस्यता करण्याच्या प्रक्रियेत समानता असावी, अकराव्या वेतन समझोत्यातील मंजूर असलेल्या सर्व तरतुदींची तातडीने अंमलबजावणी करावी, सर्व कंपन्यांमध्ये सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल निर्माण करून पुरेसा वैद्यकीय पदभरती करून आवश्यक ती औषधी उपलब्ध करून द्यावी, कॅडरशिपमध्ये बदल करून सन्मान जनक पदांची निर्मिती करावी, कळसा उद्योगांमध्ये कार्यरत महिलांच्या सशक्तीकरणासाठी कंपनी पातळीवर समितीचे गठन करावे, प्रकल्पग्रस्त शेतक-यांना भूमी अधिग्रहण नुकसान भरपाई व मोबदला वाढवून द्यावा आणि त्यांना नोकरी देताना होणारा त्रास कमी करावा, कामगारांसाठी सुरू असलेली विनानगद वैद्यकीय सुविधा सुरळीत करून सर्वांना स्मार्ट कार्ड तात्काळ देण्यात यावे, मायनिंग गैरअधिकारी वर्गाला अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यासाठी धोरणात्मक बदल करावा, सेवानिवृत्त कामगारांचे पेन्शन रिवाईज करावे, ठेकेदारी कामगारांना आठ तास काम, बायोमेट्रिक हजेरी, नियमानुसार वेतन, भत्ते, कल्याणाच्या योजना लागू करून सुरक्षा द्यावी, वेकोलिचे व ठेकेदारी कामगारांना विमा सुरक्षा द्यावी,सर्व सुरक्षा नियमांचे कोळसा खाणींमध्ये पालन करावे आणि दुर्घटनेला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, सीएमपीएफ मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, किमान पेन्शन 1000 रुपये द्यावे आणि ठेकेदारी कामगारांना वार्षीक बोनस द्यावा इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.
या आंदोलनात सर्व कामगार बंधूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय कोयला खदान मजदूर संघाने केले आहे.