१४ गोवंशांसह १२.४० लाखांचा मुद्देमाल जप्त – कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक : दोघांना अटक
- १४ गोवंशांसह १२.४० लाखांचा मुद्देमाल जप्त – कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक : दोघांना अटक @ २,८४२ वाहन चालकांवर कारवाई @ शेतातून लोखंडी खांबांसह इलेक्ट्रिक साहित्यांची चोरी @ दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात @ बेशुद्घ अवस्थेत सापडलेल्या इसमाचा मृत्यू @ फुटाळा तलावात आढळला मृतदेह
नागपूर/ E T News
ट्रकमध्ये गोवंशीय जनावरांना कोंबून त्यांची कत्तलीकरिता वाहतूक करणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईत १४ गोवंशांची सुटका करण्यात आली. तर, १२ ला १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेलतरोडी पोलिसांनी ही करवाई केली. ताझीर मतीन शेख (३५) आणि जहीर कादीर शेख (४०, दोन्ही रा. वार्ड क्रमांक १, सहायता नगर, अड्याळ, ता. पवनी, जि. भंडारा) अशी आरोपींची नावे आहेत.
बेलतरोडी पोलिसांचे पथक १८ आॅगस्टला पेट्रोलिंग करत होते. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्यांनी मिळालेल्या माहितीवरून पांजरी टोल नाका, आऊटर रिंग रोड येथे आयशर ट्रक (एमएच ४० सीडी १३४०) ला थांबविले. ट्रकची तपासणी केली असता त्यात २ लाख १० हजारांची १४ जिवंत गोवंशीय जनावरे अत्यंत निदर्यतेने कोंबलेल्या अवस्थेत दिसून आली. ताझीर मतीन शेख आणि जहीर कादीर शेख हे दोघे जनावरांची वाहतूक करत होते. त्यांची विचारपूस केली असता सर्व जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईत पोलिसांनी सर्व गोवंशीय जनावरांची सुटका करत त्यांना गोरक्षण समितीला सुपूर्द करण्यात आले. याप्रकरणी फिर्यादी राहुल प्रमोदजी नारनवरे (३०, रा. आम्रपालीनगर, हुडकेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी ट्रक मालक तसेच उपरोक्त दोन्ही आरोपींविरूद्ध कलम ५ (ब), ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा-१९९५, सहकलम ११(१) (ड) प्राणी कुरता अधिनियम-१९६०, सहकलम ८३, १७७ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
२,८४२ वाहन चालकांवर कारवाई
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ४ प्रकरणांत ४ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ३ प्रकरणांत २३ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १७,३६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली २ हजार ८४२ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख ९४ हजार ४५० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नागपूर शहर पोलिसांनी वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या राबविली. या पुढे देखील ही कारवाई प्रभावीपणे करण्यात येणार आहे. परिणामी, वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतातून लोखंडी खांबांसह इलेक्ट्रिक साहित्यांची चोरी
शेतात वीज पुरवठा घेण्याकरिता आणलेले लोखंडी खांब तसेच इलेक्ट्रिक साहित्य चोरट्यांनी लांबविले. हुडकेश्वर ठाण्यांतर्गत ही घटना घडली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हुडकेश्वर येथील लक्ष्मीनारायण मंदिरापुढील प्लॉट नंबर ७६, महाजन ले-आऊट येथे विजय केशवराव कुकडे (५५)वास्तव्याला आहेत. त्यांच्या शेतात वीज पुरवठा नव्हता. तो घेण्याकरिता त्यांनी १७ आॅगस्ट रोजी, मौजा विहीरगाव, सर्वे नंबर १६५/१, सुनिल भेंडे यांचे शेतात एकूण ७ लोखंडी पोल व ईलेक्ट्रिक साहित्य असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल आणून ठेवला होता. तो कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात
कामठी ठाण्यांतर्गत एका दुचाकी चोरी प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चोरीची दुचाकी त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आली. त्याने २६ जुलै रोजी, ही चोरी केली होती.
मोदी पडाव, हनुमान मंदीराजवळ राहणारे फिर्यादी महादेव बालाजी निपाने (२६) यांनी त्यांची दुचाकी (एमएच ४० बीबी २५९३) ही लॉक करून ठेवली होती. ती कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी विटाभट्टी चौक यशोधरानगर येथील पाटणी यांच्या घराजवळून चोरी गेलेल वाहन जप्त केले. ही दुचाकी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले.
———————————–
बेशुद्घ अवस्थेत सापडलेल्या इसमाचा मृत्यू
धंतोली पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक मुत्रिघरात बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. लोहापुलजवळ हे सार्वजनिक मुत्रिघर आहे. ३० ते ३५ वर्षाच्या हा इसम होता. सोमवारी १९ आॅगस्टला सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा व्यक्ती त्याला बेशुद्ध सापडल्यानंतर त्याला उपचाराकरिता मेडिकल रुग्णायात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतलेली आहे.
———————————-
फुटाळा तलावात आढळला मृतदेह
शहरातील फुटाळा तलावात एका ५३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला. नारायण चरणदास शेंद्रे (घर नंबर ४३८, तेलीपुरा, मस्कासाथ, ईतवारी) असे या व्यक्तीचे नाव आहे. माहितीनुसार, सोमवारी १९ आॅगस्ट रोजी, दुपारी १ वाजताच्या पूर्वी फुटाळा तलावाच्या पाण्यात नारायण चरणदास शेंद्रे (५३, घर नंबर ४३८, तेलीपुरा, मस्कासाथ, ईतवारी) यांचे प्रेत तरंगतांना मिळून आले. फायर ब्रिगेडच्या सहाय्याने प्रेत पाण्याबाहेर काढून मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी फिर्यादी ओम ईश्वर शेंद्रे (२२) यांनी दिलेल्या सूचनेवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतलेली आहे.-
———-