कुटुंब दवाखान्यात घरात चोरट्याने केला हातसाफ ( दि. २९ जुलै)
कुटुंब दवाखान्यात घरात चोरट्याने केला हातसाफ
नागपूर/E T News
घरातील पती-पत्नी आणि मुलगा मेडिकलमध्ये उपचारासाठी अॅडमिट असताना तिकडे चोरट्याने घरात डाव साधला. चोरट्याने घराच्या दाराचे कुलूप तोडून रोख रक्कम तसेच दागिने चोरून नेले. यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्लॉट नंबर ९९ राजनगर, वांजरा ले-आऊट येथे राहणारे फिर्यादी मोहंमदउल्ला अली हैदर अंसारी (३८) त्यांची पत्नी तसेच मुलगा २८ ते २९ जुलै दरम्यान, उपचाराकरिता मेडिकल रुग्णालयात अॅडमिट होते. या दरम्यान, कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील आलमारीत ठेवलेली २० हजारांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
———————————————————–
वाहन चोरट्यांना अटक : तीन गुन्हे उघडकीस
नागपूर/E T News
घरा सामोरून दुचाकी चोरी करणा-या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून तीन गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. अजनी पोलिसांनी ही कारवाई केली. यश विजय गहूकर (१९ रा. बजरंगनगर, गल्ली नंबर ५) असे या आरोपीचे नाव आहे.
बेलतरोडी येथील प्लॉट नंबर ३५, बेसा ग्रामपंचायत जवळ राहणारे शेख रमजान शेख मजीद पठाण (५५) हे २ जुलै रोजी, संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अजनी ठाण्यांतर्गत नाईकनगर येथे राहणा-या संजय बांगडे यांच्याकडे आले. त्यांनी घरापुढे दुचाकी (एम.एच. ३१ ए.एस. ६४५१) उभी केली होती. दरम्यान, हे वाहन अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. प्राप्त तक्रारीवरून पोलिसंनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या तपासात पेट्रोलिंग दरम्यान, मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पंच्याशी प्लॉट एरियाजवळ पाहणी केली असता. आरोपी हा संशयितरित्या दिसून आला. त्याला वाहनाबाबत विचारणा केली असता त्याने ते चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याची अधिक सखोल विचारपूस केली असता त्याने या वाहना व्यतिरिक्त अजनी ठाण्यांतर्गत एक सायकल आणि एका घरातून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
———————————-
१,१४३ वाहन चालकांवर कारवाई
नागपूर/E T News
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ६ प्रकरणांत ६ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १५ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये एका प्रकरणात ४ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली १ हजार १४३ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३ लाख ३७ हजार ४०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नागपूर शहर पोलिसांनी वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या राबविली. या पुढे देखील ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. परिणामी, वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित, असे आवाहन करण्यात आले आहे.
—————————————
विदेशी चलनासह घरफोड्याला अटक
गुन्हे शाखेची कारवाई : ३.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त
गणेशपेठ ठाण्यांतर्गत झालेल्या घरफोडीत चोरट्याने विदेशील चलनासह ७ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ च्या पथकाने ही कारवाई केली. शाहरूख खान वल्द हनीफ खान (२३, रा. ज्योतीनगर, खदान, तहसील, ह.मु फ्लॅट नंबर ४०३, राय आशियाना अपार्टमेंट, बिल्डींग नंबर ४, मानकापूर) असे आरोपीचे नाव आहे. १५ ते १६ जुलै दरम्यान, ही घरफोडी झाली होती.
घर नंबर ६१२, जोशी भवन, घाट रोड येथे राहणारे फिर्यादी संजय उर्फ गोपाल सत्यनारायण जोशी (६२) हे त्यांच्या घराला कुलूप लाऊन कुटुंबियांसह इंदोरला गेले होते. दरम्यान, चोरट्याने घराच्व्या दराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी आलमारीत ठेवलेले अमेरिकन डॉलर, दुबई व सिंगापूर करंसी, सोन्या-चांदीचे दागिने व ५० हजारांची रोकड असा एकूण ७ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपासात गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी तांत्रिक तपास केला. तपासांती त्यांनी शाहरूख खान वल्द हनीफ खान याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने उपरोक्त गुन्ह्याची कबुली दिली. त्याने ही घरफोडी त्याचे साथिदार क्षीतिज चौकसे (रा. बुध्दनगर, पाचपापली), एक विधीसंघर्षग्रस्त बालक (रा. तहसिल) यांच्यासोबत केल्याचे सांगितले. आरोपीची सखोल विचारपूस केली असता त्यांने घरफोडी व्यतिरिक्त नवीन कामठी ठाण्यांतर्गत वाहन चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातुन अमेरिकन करंसी, दुबई, मलेशिया, सिंगापूरची करंसी, वेगवेगळया देशाच्या करंसीचे नाणे, तसेच चोरी केलेले वाहन, सोन्याची चेन, मोत्याची माळ असा एकूण ३ लाख २६ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
———————————–
अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
कंपनीचे काम आटोपून सायकलने घरी जाणा-या कर्मचा-याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात कर्मचा-याचा मृत्यू झाला. रघुवीर तितर जाधव (५५, रा. प्लॉट नंबर ८६, गजानननगर, हिंगणा रोड) असे मृतकाचे नाव आहे.
माहितीनुसार, १३ जुलै रोजी, रात्री ८ वाजताच्या सुमारास रघुवीर जाधव हे आय.सी चौकातील कंपनीतून काम आटोपल्यानंतर सायकलने घरी परत येत होते. यावेळी, त्यांच्या मागून येणा-या अज्ञात वाहन चालकाने त्यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत उपचाराकरिता प्रथम लता मंगेशकर रुग्णालयात व येथून मेडिकल रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान २८ जुलै रोजी, संध्याकाळी ८ वाजता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी फिर्यादी चंदन रघुवीर जाधव (२९, रा. प्लॉट नंबर ८६, गजानननगर, हिंगणा रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध कलम १०६, २८१ भादंवि सहकलम १३४, १८४, १७७ मो.वा. का अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
————————–