prashant koratkar प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : ” पैदल ते आलिशान कार ” पर्यंतचा प्रवास !

प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
सर्वपक्षीय शिव सन्मान मोर्चेकरांची मागणी
इतिहासाचे गाढे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणे, अश्लील कमरेखालची शिवीगाळ करणे, एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी पळाले व संभाजी महाराज अय्याश होते, अशा चिड आणणाऱ्या एकेरी भाषेत अपमान करणे या तक्रारीवरून प्रशांत कोरटकर याचा पोलीस शोध घेत आहेत.
सकल मराठा समाजाने तर त्याच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलनाचे बिगुल पुकारले आहे. पोलीस शोधत नसतील तर आम्ही त्याला पकडून धडा शिकवू, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शिवप्रेमी प्रशांत कोरटकरच्या विरोधात खवळून उठले आहेत.
प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलीस ठाण्यात तसेच बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, परंतु बेलतरोडी पोलीस ठाण्यातील गुन्हा हा कोल्हापूर ठाण्यात वर्ग करण्यात आला. सध्या तो जामिनावर आहे.
प्रशांत कोरटकरच्या पत्नीने त्याचा मोबाईल, सिम कार्ड तसेच इतर साहित्य सायबर क्राईम पोलिसांकडे जमा केले. आतापर्यंत तरी प्रशांत कोरटकर हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
इकडे प्रशांत कोरटकरच्या विरोधात सकल मराठा समाज उग्र झालेला आहे तर नुकताच अमरावती येथे छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचा वारंवार अपमान होत असल्याबद्दल भव्य सर्वपक्षीय शिव सन्मान मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक गणमान्य नेते मंडळी सहभागी झाली होती. यावेळी प्रशांत कोरटकरच्या विरोधात घोषणा देत त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली व यापुढे छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल, असाही इशारा देण्यात आला. तर प्रशांत कोरटकरवर कडक कारवाई केली जाईल तसेच त्याला कदापिही सोडण्यात येणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केले. चौकशी दरम्यान नावासमोर लावत असलेली डॉक्टरची डिग्री बोगस असल्याचेही उघड झाले आहे.
प्रशांत कोरटकर यांच्याकडे असलेल्या रोल्स रॉइस या महागड्या आलिशान कार आल्या कुठून याचाही शोध घेण्यात यावा. यासोबतच त्याच्या चल अचल संपत्तीची इडी कडून चौकशी करण्यात यावी,
प्रशांत कोरटकरचा बोलविता धनी कोण ? त्याच्या आका कोण ? हेही समोर येणे आवश्यक असल्याची मागणी मोर्चेकरांनी केली.
इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ केल्यानंतर किंवा हे सर्व प्रकरण घडल्यानंतर ‘मी तो नव्हेच’ अशा अविर्भावात प्रशांत कोरटकरने आपली भूमिका मांडली. इंद्रजीत सावंत यांना मी शिवीगाळ केलीच नाही, धमकी दिलीच नाही, शिवाजी महाराजांबद्दल मी काहीच बोललो नाही, मी कसा बोलू शकतो, तो माझा आवाज नाही, असा सारवासारव करण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु त्यात त्याला अपयश आले.
आता प्रश्न असा पडतो की हा प्रशांत कोरटकर आहे तरी कोण ? त्याच्या व्यवसाय काय ? नेमकं तो कोणते काम करतो ?
मंत्र्यांसोबत, नेतेमंडळींसोबत, आयपीएस अधिकाऱ्यांसोबत तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत फोटो काढून ते फेसबुक वर टाकणे प्रशांत कोरटकरचा आवडता छंद. या त्याच्या छंदाच्या मानसिकतेतून त्याला एक वेगळाच भ्रम निर्माण झाला किंवा मानसिक रोग जडला तो असा की, आपले कोणीच काही वाकडे करू शकत नाही. आपले वरिष्ठ स्तरावर, उच्च पातळीवर संपर्क आहेत आणि जवळचे संबंध आहेत,
परंतु ज्या प्रामाणिक नेते मंडळी, मंत्री , अधिकारी तसेच मान्यवरांशी प्रशांत कोरटकरने सोबत फोटो काढलेले आहेत ते मात्र कोरटकरच्या या दुष्कृत्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून उलट सुलट चर्चेला पेव फुटतो. प्रशांत कोरटकरने या वरिष्ठ पातळीवरच्या मान्यवरांना कुणाला मोठे बंधू, लहान बंधू, कुणाला भाऊ तर कुणाला मित्र, असे संबोधले आहे. यावरून प्रशांत कोरटकरने आपले किती जवळचे संबंध आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पत्रकारांचे सर्वांसोबतच संबंध असतात. परंतु असे करताना त्यातून आपले कार्यभाग साधणे हे समजण्या पलीकडचे आहे. याच मोठ्या व्यक्तींच्या संबंधातून प्रशांत कोरटकर हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत असल्याची चर्चा आहे. म्हणजे प्रथम मंत्र्यांसोबत फोटो काढणे त्याची छाप पोलीस अधिकाऱ्यांवर टाकणे आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत काढलेल्या फोटोची छाप इतरांवर पाडणे यात त्याची कार्यकुशलता वाखाणण्याजोगी आहे. गडगंज संपत्ती आणि आलिशान कारमध्ये फिरणे इतपत पत्रकारांचे वेतन नसते. पत्रकार सेवानिवृत्त होईपर्यंत हलाखीचे जीवन जगत असतो. परंतु कमी कालावधीत एवढा मोठा चमत्कार एक पत्रकार घडवून आणतो हे एक नवलच आहे.
आता बघूया प्रशांत कोरटकरचा ” पैदल यात्रेपासून आलिशान कार” पर्यंतचा प्रवास
प्रशांत कोरटकर हा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका कापड गिरणी कामगाराचा मुलगा. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रशांत हिंगणघाट येथून नागपूरला आला. तेव्हा त्याच्याजवळ अंगावरील कपडे आणि दोन भांडी तसेच चटई होती. निवारा हवा म्हणून प्रशांतने नागपुरातील टिळक नगरात एक दहा बाय दहाची खोली भाड्याने घेतली आणि तेथून त्याच्या प्रवास पुढे सुरू झाला.
प्रशांत कोरटकरने पत्रकार होण्यापूर्वी नागपूर शहरात अनेक प्रकारची छोटी मोठी कामे केली.आपल्या उदरनिर्वाहासाठी तो वणवण भटकू लागला. अनेक ठिकाणी पायपीट केल्यावर त्याला सन 1999/2000 च्या काळात नागपूर दूरदर्शन मध्ये ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह असलेल्या अजय राजकारणे व तेथेच कॅमेरामन व्हिडिओ एडिटर असलेल्या विलास आगलावे यांच्या ‘मीडिया वेव्हज’ या कंपनीत काम मिळाले.
ही कंपनी स्टोरी बेसिसवर मुंबई दूरदर्शनला बातम्या द्यायची. या सोबतच या कंपनीने नागपूर दूरदर्शनामध्ये नोकरी करणाऱ्या गणेश शर्मा याला सोबत घेऊन दूरदर्शन मेट्रो चॅनेलवर सुरुवातीला रात्री अर्धा तासाचे न्यूज बुलेटिन ‘आज तक’ लाही नागपुरातील बातम्या पुरविण्याचे काम घेतले. परंतु गणेश शर्मा याला वेळ नसल्याने मग विलास आगलावे यांची पत्नी वर्षा आगलावे यांचे परिचित दिवाण टायर्स येथे काम करणारे मनीष अवस्थी यांना सोबत घेतले. पुढे आज तक चे २४ तास बातम्यांचे चॅनेल सुरू झाल्याने आज तक ने मनीष अवस्थी यांना पूर्ण वेळ बातमीदार म्हणून पगारी ठेवून घेतले. प्रशांत कोरटकर व मनीष अवस्थी हे पूर्वी एकाच ठिकाणी काम करीत असल्याने मनीष अवस्थीने प्रशांत कोरटकरला करार पद्धतीवर बातमीदार म्हणून नियुक्त केले. येथे ६ ते ८ महिन्यात त्याच्या कामात योग्य प्रगती दिसली नसल्याने आज तक ने प्रशांत कोरटकरला पूर्वोत्तर राज्यात बदलीवर पाठविले. तेथेही त्याला जमत नसल्याने त्याने पुन्हा मनीष अवस्थीच्या मध्यमाने नव्यानेच सुरू झालेल्या आयबीएन लोकमत या मराठी वृत्त वाहिनीत नागपूरसाठी बातमीदार म्हणून नियुक्ती मिळविली.
येथे काही वर्ष काम करतांना त्याच्याविषयी बातम्यासाठी पैसे मागणे व जाहिरातीसाठी अधिक पैसे घेतल्याच्या अनेक तक्रारी आयबीएन लोकमत व्यवस्थापनाकडे आल्या. व्यवस्थापनाने या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर त्याला रजेवर पाठवून मुंबईतून बातमीदार नियुक्त केले. त्यानंतर जय महाराष्ट्र या वृत्त वाहिनीत काम मिळविले. परंतु तेथेही तो अधिक काळ तग धरू शकला नाही. यात यश मिळत नसल्याचे बघता प्रशांत कोरटकरने स्वतःचा विदर्भ माझा युट्युब चॅनेल सुरू केला. जसे की आज सर्वत्र बघायला मिळते.
पूर्वी प्रतिथयश चॅनेलमध्ये काम करीत असल्याने त्याने पूर्वी मुख्यमंत्री व त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री यांचेशी जवळीक साधून सरकार स्तरावर सर्वत्र मुख्यमंत्र्याचे परिचित म्हणून ओळख निर्माण केली.
सध्या त्याचे मुख्य काम पत्रकारितेपेक्षा गृहविभागातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या मंत्रालय स्तरावरून बदली करण्याचे असल्याचे बोलले जाते.
प्रशांत कोरटकरची काही बोलकी छायाचित्रे…
प्रशांत कोरटकरचे प्रतिष्ठित मान्यवरांशी काढलेले फोटो यावरून त्यांचे कोरटकर सोबत जवळचे संबंध आहेत किंवा असावेत, असा दावा ”एव्हरी टाईम न्यूज” करीत नाही