विवाहबाह्य प्रेमसंबंध : गर्भपात करताना महिलेचा मृत्यू … “त्या” क्रुरकर्म्यांनी तिच्या मृतदेहासह तिच्या दोन जिवंत मुलांनाही नदीत दिले फेकून
विवाहबाह्य प्रेमसंबंध : गर्भपात करताना महिलेचा मृत्यू …
त्या क्रुरकर्म्यांनी तिच्या मृतदेहासह तिच्या दोन जिवंत मुलांनाही नदीत दिले फेकून
E T News
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे विवाहबाह्य अनैतिक संबंध एका तरुणांशी होते. प्रेम संबंधातून सदर महिला गरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्यासाठी प्रियकरांनी तिला एका मित्रासोबत ठाणे येथील एका रुग्णालयात पाठवले. मात्र, उपचारादरम्यान सदर महिला मृत झाल्यानंतर तिला पुन्हा तळेगाव या ठिकाणी घेऊन येत तिचा, मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिल्याचा खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी महिलेची दोन मुले रडत असल्याने त्यांना देखील आरोपीने साथीदाराच्या मदतीने जिवंत असतानाच पाण्यात फेकून दिले. या तिहेरी हत्याकांडात सहभागी असलेल्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू
पोलिस उपायुक्त बापू बांगर यानी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन अंतर्गत विवाहित महिला बेपत्ता असल्यावरून मिसिंग प्रकरण दाखल करण्यात आलेले होते. सदरच्या चौकशीमध्ये बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रासोबत ठाणे येथे पाठविले होते. सदर ठिकाणी उपचारादरम्यान नमूद महिलेचा मृत्यू झाला.
त्यानंतर प्रियकराच्या मित्राने संबधित मृतदेह व महिलेच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येवून तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक ९ जुलै २०२४ रोजी पहाटे प्रियकराच्या मदतीने मृतदेह नदीमध्ये फेकून दिला.
यावेळी त्या महिलेच्या दोन मुले देखील सोबत असल्याने त्यांनी हा प्रकार पाहिला अन् ते रडायला लागले. त्यामुळे आरोपी दोघांनी त्या मुलांना देखील जीवंत नदीपात्रात फेकून दिले. याअनुषंगाने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रियकर गजेंद्र दगडखैर व त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक करण्यात आलेली आहे. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक तळेगांव एमआयडीसी हे करीत आहेत.