मुसळधार पावसामुळे नागपूर-वर्धा महामार्ग जलमय
वर्धा, धाम अन् वणा नदीच्या पाणी पातळीत वाढ
जिल्हाधिकाऱ्यांनी केली शहरातील विविध भागांची पाहणी
वर्धा/E T News
पवनार, शुक्रवारी सकाळी सुमारे अडीच ते तीन तास सतत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर-वर्धा हा महामार्ग जलमय झाला होता. या महामार्गाला बुटीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय या महामार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले आहे. पण कंत्राटदाराकडून संबंधित विकास काम पूर्णत्वास नेताना मनमर्जीचा सपाटा लावण्यात आल्याने सध्या या मार्गावर पावसाचे पाणी साचत आहे. शुक्रवारी तर पवनार परिसरात हा महामार्ग जलमय झाला होता. संभाव्य धोका लक्षात घेता या महामार्गावरून शुक्रवारी एकेरी वाहतूक सुरू होती. पावसाने विश्रांती घेतल्यावर आणि रस्त्यावरील पावसाचे ओसरल्यावर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. पवनार भागातील पेट्रोल पंप ते मामा भांजा दर्गाहपर्यंतचा सुमारे 2 किमीचा रस्ता पावसामुळे जलमय होत रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली शहरातील विविध भागांची पाहणी
हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. जिल्ह्यामध्ये आज सकाळ पासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सकाळी शहरातील शिवाजी चौक, नालवाडी, आलोडी येथील भागाची पाहणी केली.
सतत दोन तास झालेल्या पावसामुळे काही नदी, नाल्यांना पूर आला असून पवनार येथील नॅशनल हायवेवर पाणी साचल्यामुळे वाहतूक प्रभावित झाली होती, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात येताच तात्काळ जेसीबी लावून पाण्याचा विसर्ग करण्यात आला व वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
समुद्रपूर तालुक्यातील तीन मंडळामध्ये अतिवृष्टी
समुद्रपूर तालुक्यातील वायगाव, कोरा, निंदोरी येथील मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने वालधूर ते पिंपळगाव, हिंगणघाट ते उमरी मुरबाड रस्ता, हिंगणघाट ते येनोरा मार्ग, हिंगणघाट ते कुंभी सातेफल मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. भोसा सिंधी मार्ग पुलावर पाणी आल्याने सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. ग्रामपंचायत गोंविदपुर पुलावर पाणी आल्याने हा मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
—————————————————–
वर्धा, धाम अन् वणा नदीच्या पाणी पातळीत वाढ
वर्धा : जिल्ह्यातून वाहणारी वर्धा, वणा व धाम या तीन मोठ्या नद्या आहेत. धाम नदीची इशारा पाणी पातळी 224.80 मिटर, वणा नदीची इशारा पाणी पातळी 214.24 मिटर तर वर्धा नदीची इशारा पाणी पातळी 238 मिटर आहे. तर सध्या धाम नदीची पाणी पातळी 216.39 मिटर असून विसर्ग 30.37 आहे. वणा नदीची पाणी पातळी 203.67 असून विसर्ग 59.47 तर वर्धा नदीची पाणी पातळी 228.65 मिटर असून विसर्ग 112.87 इतका असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे धाम, वणा व वर्धा नदी सध्यातरी इशारा पातळीच्या खाली वाहत आहे. पण संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट
मोडवर आला आहे.