साक्षात सक्षमीकरण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे जागतिक महिला दिन

साक्षात सक्षमीकरण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे जागतिक महिला दिन

नागपूर : साक्षात सक्षमीकरण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर यांच्या वतीने काछीपूरा, रामदासपेठ येथे दि. 11 मार्च 2026 रोजी सायंकाळी जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व होली मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात बजाजनगर, नागपूर पोलीस स्टेशनच्या महिला नायक पोलीस अधिकारी विद्याताई लोंडसे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. त्याच प्रमाणे या प्रसंगी रंजना बारसाकडे, डब्ल्यू पी.सी. निशा पालेकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजात अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या तृतीयपंथीय बांधवांना विशेष निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. समाजाने त्यांच्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा या हेतूने संस्थेने त्यांना मंचावर स्थान देऊन त्यांचा गौरव केला. तसेच परिसरात स्वच्छता राखण्यासाठी योगदान देणाऱ्या मनपा येथून सेवानिवृत्त सफाई कामगार बेबीताई यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला व महिला व इतर कामात अंगरक्षकाची सेवा देणारी सायलीताई यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या भाजपा च्या माजी नगरसेविका वैशालीताई चोपडे यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे
याप्रसंगी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील कायदे व हक्कांविषयी मार्गदर्शन केले. नगरसेविका चोपडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शासनाकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत असून महिलांनी त्यांचा लाभ घेऊन स्वतःला सक्षम बनवावे.
कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या अध्यक्षा सुनिताताई पाटील यांनी उपस्थित मान्यवर व महिलांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी संस्थेचे सचिव सुनित फुलझेले यांची विशेष ओळख करून देत संस्थेच्या कार्यात देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या व त्यांच्या सहपत्नी सत्कार केला.
मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर होली मिलन कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थितांनी एकमेकांना गुलाल लावून व होळीच्या भजनावर ताल धरत आनंदाने होली मिलन उत्सव साजरा केला. त्यानंतर उपस्थितांनी भोजनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो महिलांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे संचालन संस्थेच्या अध्यक्षा सुनिताताई पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव सुनित फुलझेले, अलकाताई गवई, नंदाताई कर्णेवार, पुष्पा सोमनकर, मालाताई गणवीर, आशाताई गेडाम, लक्ष्मी जांभुळकर तसेच इतर महिला कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


