नागपूरच्या दाम्पत्याने भंडाऱ्याच्या वैनगंगेत केली आत्महत्या – आर्थिक विवंचनेतून घडली घटना

नागपूरच्या दाम्पत्याने भंडाऱ्याच्या वैनगंगेत केली आत्महत्या – आर्थिक विवंचनेतून घडली घटना
भंडारा/E T News
एका दाम्पत्याने कारधा येथील वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. दोघांचेही मृतदेह सापडले असून आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये मनोज बाबुराव सुदामे (५१) आणि भारती मनोज सुदामे (४७, रा. दिलीप नगर नझुल लेआउट, नागपूर) यांचा समावेश आहे. ९ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.१५ वाजता वैनगंगा नदीच्या लहान पुलावरून या दाम्पत्याने नदीत उडी मारली होती. पत्नीचा मृतदेह सोमवारी, १२ आॅगस्ट रोजी आणि पतीचा मृतदेह मंगळवारी, १३ आॅगस्ट रोजी सापडला.
कारधा पोलिस ठाण्यांतर्गत वैनगंगा नदीवरील लहान पुलावरून ९ आॅगस्ट रोजी या जोडप्याने उडी मारली होती. कारधा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जावून माहिती घेतली. पोलिसांना बॅगमध्ये ब्लँकेट आणि त्यांचे कपडे सापडले. कोणतेही ओळखपत्र किंवा कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे मृतांची ओळख पटलेली नव्हती. सोमवारी, १२ आॅगस्ट रोजी तिड्डी नदीकाठावर महिलेचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी, १३ आॅगस्ट रोजी पतीचा मृतदेह सापडला. पतीच्या खिशात सापडलेल्या आधारकार्डवरून मनोज बाबुराव सुदामे असे नाव कळले. त्यामुळे मृत महिलेचे नाव भारती मनोज सुदामे (४७) असल्याची माहिती समोर आली.
मनोज प्रॉपर्टीचे काम करायचा. आर्थिक विवंचनेला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कारधा पोलिसांनी १४ आॅगस्ट रोजी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. तपास पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम थेर करीत आहेत.