वेकोलि कामगार, अंगणवाडी सेविका यांच्यासह लाखो कष्टकरी सहभागी होणार

-
१२ फेब्रुवारी रोजी देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांचा देशव्यापी संप -
वेकोलि कामगार, अंगणवाडी सेविका यांच्यासह लाखो कष्टकरी सहभागी होणार
राजुरा, ता.प्र. –
दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी (गुरुवार) देशातील दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी संयुक्त आघाडी करून केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात देशव्यापी संपाची हाक दिली आहे. केंद्र सरकारने अस्तित्वात असलेले २९ कामगार कायदे रद्द करून त्यांचे चार कामगार कोडमध्ये रूपांतर केले असून, या कामगार संहितेमुळे कामगारांचे मूलभूत हक्क हिरावले जात असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. कामगारांना गुलाम बनविण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत या अन्यायकारक कायद्यांविरोधात कामगार, शेतकरी, व्यापारी व कष्टकरी वर्गाने एकजुटीने आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील कोळसा खाणीत आयोजित द्वारसभेत कामगार संघटनांच्या क्षेत्रीय पदाधिकाऱ्यांनी संप यशस्वी करण्याचे आवाहन केले. या संपात एच.एम.एस., आयटक, इंटक आणि सिटू या प्रमुख कामगार संघटनांचे कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मात्र, भारतीय मजदूर संघ या संपात सहभागी नाही.
या द्वारसभेत एच.एम.एस.चे अशोक चिवंडे, रंगराव कुळसंगे, विरया गजूला, प्रकाश खरतड, विजय कानकाटे, आर.आर.यादव,देवेंद्र कोलूरी, पंकज जुल्मे विरन्ना जी राजन्ना जी सुजीत निर्मल सुरेंद्र मोहितकर आयटकचे , दिलीप कनकुलवार, रायलिंगू झुपका, श्रीपुराम रामलू, रवी डाहुले, दिनेश जावरे, इंटकचे विश्वास साळवे, बंडू लांडे तसेच सिटूचे शेख जाहिद, गणपत कुडे आदी नेत्यांनी मार्गदर्शन केले.
या कामगार नेत्यांनी केलेल्या भाषणात सांगितले की, नव्या कामगार कोडमुळे कायम नोकरीची हमी, सामाजिक सुरक्षा, संघटन स्वातंत्र्य आणि न्यायालयीन संरक्षण यावर मर्यादा येणार असून कंत्राटीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे वेकोलि कामगार, अंगणवाडी सेविका, कंत्राटी कामगारांसह सर्व कष्टकरी घटकांनी या संपात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात हा संप यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू असून गेल्या तीन दिवसांपासून सर्व कोळसा खाणींमध्ये द्वारसभा घेऊन कामगारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी कामगारांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. १२ फेब्रुवारीचा संप ऐतिहासिक यशस्वी करण्याचा निर्धार कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे.
——————-+++++++



