पाकिस्तानला मदत करणे महागात पडले : भारताचा तुर्कीला इशारा

पाकिस्तानला मदत करणे महागात पडले
भारताचा तुर्कीला इशारा
कॅनडामध्ये जी ७ च्या परिषदेला जाता जाता मोदींनी सायप्रसला भेट देऊन भारताच्या बदलत्या धोरणाचे संकेत देतांनाच पाकला भारताविरुद्ध प्रत्यक्ष मदत करणाऱ्या तुर्कीला एक प्रकारे इशारा दिला आहे.
ज्या तुर्कीला २०२३ मध्ये तुर्कीत आलेल्या भूकंपात भारताने “ऑपरेशन दोस्त” राबवून बचाव पथके, वैद्यकीय मदत, व इतर आवश्यक सामग्री पाठवून मदत केली होती. त्याच तुर्कीने पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया केल्या असता भारताने पाक विरुद्ध केलेल्या “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान पाकीस्तानला ड्रोन देवून भारताविरुद्ध प्रत्यक्ष मदत करून आपला विश्वासघातकी स्वभाव उघड केला आहे. त्यामुळे तुर्कीचा शत्रू असलेला पण आधीपासूनच भारताचा मित्र असलेल्या सायप्रसला भेट देऊन शत्रूचा शत्रू तो मित्र या उक्ती प्रमाणे जर तुर्की पाकिस्तान सोबत असेल तर भारत सायप्रस सोबत आहे असा इशारा भारताने दिला आहे.
सायप्रस
सायप्रस हा भूमध्य समुद्रातला तिसरा मोठा द्विप-देश आहे. ह्याच्या उत्तरेला तुर्कीए उत्तर पश्चिमेला ग्रीस, पूर्वेला सीरिया लेबनॉन व इस्त्राईल आहे, केवळ ९२५१ चौरस किमी. क्षेत्रफळ असलेल्या या देशाची लोकसंख्या २०२१ च्या गणनेनुसार ९२३२७२ आहे. यात मुख्यत्वे ग्रीक, तुर्की, अर्मेनियम व मेरोनाईट आदी जातींचा समावेश आहे. सायप्रसची राजधानी निकोलिया असून राजभाषा ग्रीक व तुर्की आहे. सायप्रस हा नाटो व युरोपीयन संघाचा सुद्धा सदस्य आहे. सायप्रसला जानेवारी २०२६ मधे युरोपीय संघाच्या अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. सायप्रस वरील सत्तांतरे वेळोवेळी अलेक्झांडर नंतर इजिप्त, रोमन, बायझेंटाईन, व्हेनिस आदी विविध राजसत्तेचा भाग राहीलेल्या सायप्रस वर १५७०-७१ साली ऑटोमन सेनेने हल्ला करून कब्जा केला. अनेक ग्रीक व अर्मेनियन ईसाईंना ठार केले. तसेच गैर मुस्लिमावर कडक बंधने लादली. १८२१ मध्ये ग्रीक मध्ये स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात झाल्याने त्यात भाग घेण्यासाठी साईप्रस मधून अनेक ग्रीक, ग्रीस मध्ये गेले. ऑटोमनच्या राजेशाही विरुद्ध साईप्रस मधील ग्रीक व तुर्की जनतेने अनेक संघर्ष केले, पण ते विफल झाले.
१८७७-७८ च्या रुसो- तुर्की- रोमानिया स्वातंत्र्य युद्धातील बर्लिन करारानुसार सायप्रस ब्रिटनच्या ताब्यात आले. १९१४ मध्ये सायप्रसला औपचारिक रित्या ब्रिटनच्या अधिपत्या खालील भाग घोषित करण्यात आले. ब्रिटिश शासन काळात सायप्रस मधील ग्रीक व तुर्की यांच्यामध्ये वैचारिक संघर्ष सुरू होते. ग्रीकांची सहानुभूती ग्रीसकडे होती, तर तुर्कांची तुर्कस्तान कडे. दुसऱ्या महायुद्धात सायप्रस चे ग्रीक व सायप्रस तुर्की हे सेनेत भरती झाले. १९५५ मध्ये ग्रीस समर्थकांनी इओकेए नामक सशस्त्र संघटना स्थापन केली तर तुर्की समर्थकांनी तुर्की प्रतिरोध संघटना टी एम टी ची स्थापना केली.
तुर्कीने बळकावला सायप्रसचा भूभाग
१९६० मध्ये सायप्रस ब्रिटनच्या ताब्यातून स्वतंत्र झाला. त्यावेळेला त्याच्या लोकसंख्येत ग्रीक ७७.१%, तुर्क १८.२% ,व अन्य ४.७% होते. १५ जुलै १९७४ मध्ये ग्रीस समर्थित सेनेने शासनाचा तख्तापालट केला. तेव्हा यामुळे तुर्की जनतेवर अन्याय होत आहे, असा आरोप करून तुर्कीएने आपली सेना सायप्रस मध्ये घुसवून उत्तरेकडच्या बऱ्याचश्या भागावर बेकायदेशीररित्या कब्जा केला. तीन दिवसांनी युद्धबंदी झाली. त्यावेळेला सायप्रसचा उत्तरेकडचा जवळपास ३६ टक्के भाग तुर्की सेनेने ताब्यात घेतला होता. १९८३ मध्ये याच भागाला तुर्की गणराज्य म्हणून स्वतंत्र देश जाहीर करून तुर्कस्तानने स्वतः त्याला मान्यता दिली. मात्र सायप्रसच्या उत्तर भागावर तुर्कीचा असलेला हा कब्जा अवैध व बेकायदेशीर असल्याचे जगाचे म्हणणे आहे. त्यामुळे या नव्या राज्याला कोणीही मान्यता दिली नाही.
आज सायप्रस दोन भागात विभाजीत असून दक्षिण भाग हा ग्रीक रिपब्लिकन सायप्रस गणराज्य तर उत्तरेकडील तुर्कीए ने बळकावलेला 36 टक्के भाग, याला तुर्कीए तुर्की गणराज्य म्हणतो. पण जगाला हे मान्य नाही.सर्व देशांनी याला बेकायदेशीर व अवैध म्हटले आहे. तुर्कीने आपल्या ताब्यातील भागातून दीड लाखाचे वर ग्रीकांना निष्कासित केले. तर ग्रीकांनी आपल्या दक्षिण सायप्रस मधून ५० हजाराचे वर तुर्कांना बाहेरचा रस्ता दाखविला. उत्तर व दक्षिण सायप्रस च्या मध्ये चार टक्के भाग हा बफर झोन म्हणून युनोच्या ताब्यात आहे. तर धेकेलीया व ॲक्रोटीरी भागात इंग्लंडचे सैनिकी तळ आहेत. यानंतर तुर्कीएने लाखो तुर्कांना उत्तर साईप्रसमध्ये आणून बसविले आज उत्तर सायप्रस मधून इसाई जनतेचा जवळपास पूर्ण सफाया करण्यात आला असून हा भाग तुर्की सेनेच्या ताब्यात आहे.
अशीच परिस्थिती पाक व्याप्त काश्मीरातही आहे. पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीर मधे पाक मुसलमानांना आणून बसविण्याचा सतत प्रयत्न पाकिस्तान करीत असतो. याच कारणामुळे तुर्की नेहमी काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानची बाजू घेऊन एक प्रकारे आपल्या उत्तर सायप्रस वरील ताब्याचे समर्थन करीत असतो. मोदीच्या साईप्रस भेटीने तुर्कीची आगपाखड होणार आहे. यामुळे ग्रीक तुर्की मधील वाद सतत पेटत राहून भारत गीत विचारांना बर मिळेल व हेच भारताचे धोरण आहे.
विकास व व्यापाराच्या संधी
सायप्रस हा भारत मध्य पूर्व युरोप कॅरिडोरचा सदस्य आहे.मोदींच्या या सायप्रस भेटीने भारत व सायप्रस मधील द्विपक्षीय संबंध सुधारणे, तसेच व्यापार, गुंतवणूक , जहाज बांधणी , डिजिटल पेमेंट नागरी उड्डाण आदी क्षेत्रात साईप्रसमधील कंपन्यांना गुंतवणुकीची संधी आहे. त्याचप्रमाणे सायप्रस पूर्व-भूमध्य सागरात असून युरोप , पश्चिम आशिया व आफ्रिका यांच्या त्रिकोणावर आहे. हे स्थान सामाजिक दृष्ट्या ऊर्जा परिवहन व राजनैतिक दृष्ट्या ही महत्त्वाचे आहे. शिक्षण व सांस्कृतिक रित्या मेडिकल व हॉस्पिटॅलिटी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने व्यापाराच्या दृष्टीने ही भारताला सायप्रस ची मदत होऊ शकते.
भारताचा पाठीराखा सायप्रस
सायप्रस हा काश्मीर मुद्द्यावरून नेहमीच भारताची बाजू घेत असतो, तसेच भारताच्या युनो मधील सदस्यत्वासाठी अनु पुरवठादार गटातील तसेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी मधील भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वालाही ही सायप्रस नेहमीच पाठिंबा देत आला आहे. यापूर्वी १९८२ मध्ये इंदिरा गांधी ने व २००२ मध्ये अटल बिहारी वाजपेयींनी सायप्रसला भेट दिली होती. त्यानंतर वीस वर्षाच्या कालखंडानंतर सायप्रसला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे तिसरे पंतप्रधान आहेत. या दौऱ्यात सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलीडेस यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करून सायप्रसचा सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियो हा सन्मान प्रदान करून गौरव केला आहे. आपण हा सन्मान भारत व सायप्रस मधील मैत्रीपूर्ण संबंधांना, सामायिक मूल्यांना व परस्पर सामोपचाराला समर्पित करतो. असे मोदींनी उत्तरा दाखल म्हटले. तसेच पाकिस्तानने भारतावर केलेल्या दहशतवादी हल्याचा निषेध करून भारताने” ऑपरेशन सिंदूर” द्वारे दिलेल्या कृतीला सायप्रस ने पाठिंबा दर्शविला आहे. त्या पाठिंब्याचेही आभार मानले.
त्यामुळे भारतासाठी जसा पाकिस्तान विश्वासघातकी आहे तसाच सायप्रस साठी तुर्की आहे. म्हणून जर तुर्कीए पाकिस्तानला पाठिंबा देत असेल तर भारतही सायप्रसला पाठिंबा देऊन जशास तशी परतफेड करण्याचे धोरण आखत आहे.
भालचंद्र ठोंबरे : ९८३४३५०८९५
