साक्षात सक्षमीकरण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम
साक्षात सक्षमीकरण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम
नागपूर विशेष/ प्रतिनिधी
दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी साक्षात सक्षमिकरण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर यांच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळा (म.न.पा.), नागपूर येथील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य नोटबुक्स, अभ्यासपुस्तके, पाटी-पेन्सिल इत्यादी साहित्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक आणि देवी सरस्वती यांच्या प्रतिमे ला संस्थेच्या अध्यक्षा-सुनिताताई पाटील यांह्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी गावंडे मॅडम, शिक्षिका अजिता संगावार मॅडम, सुदर्शन लाघवे सर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच संस्थेचे पदाधिकारी उपाध्यक्ष-अलकाताई गवई, कोषाध्यक्ष-नंदाताई कर्णेवार, सदस्य- पुष्पाताई सोमनकर व ज्योति फुलझेले यांचा ही समावेश होता, संस्था अध्यक्षा सुनिताताई पाटील यांचे स्वागत मुख्याध्यापिका माधुरी गावंडे मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले तर सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत संस्थेच्या अध्यक्षा सुनिताताई पाटील यांनी केले.

संस्थेच्या अध्यक्षा- सुनिताताई पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, “शिक्षण हाच खरा पाया असून या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचे भविष्य घडते. नोटबुक्सचे हे पाने म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीची सुरुवात आहे.” तसेच त्यांनी संस्थेचा उद्देश मांडताना सांगितले की, “साक्षात सक्षमिकरण संस्था ही वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत राहील.”
कार्यक्रमाची संचालन शिक्षिका अजिता संगावार तर संस्थेचे सचिव सुनित फुलझेले यांनी सामाजिक उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व सहकार्यांचे आभार मानले.




