निस्पृह कर्मयोगी : डॉ. सुधाकर मोगलेवार
डॉ. सुधाकर मोगलेवार स्मृतीदिनानिमित्त विशेष लेख
निस्पृह कर्मयोगी : डॉ. सुधाकर मोगलेवार
डॉ. सुधाकर मोगलेवार हे महाराष्ट्रातील वीरशैव साहित्याचे संशोधक अभ्यासक होते. त्याचे महान व्यक्तिमत्त्व, कर्तृत्वशक्ती, अफाट कार्यक्षमता, साहित्यविषयीचे त्यांचे अगाढ प्रेम, सामाजिक तळमळ. शैक्षणिक शिस्त, साहित्याची अविरत साधना तसेच प्रशासकीय दांडगा अनुभव असे हे रसायन होते.
मराठीचे ज्येष्ठ व श्रेष्ठ प्राध्यापक, समर्थ संशोधक व मार्गदर्शक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थाचे निर्देशक, या सर्व भूमिकांतून त्यांचे बहुमुखी कार्य सिद्ध होते आणि अभिमानाने ऊर भरून येतो.
डॉ. सुधाकर मोगलेवार यांचा जन्म वडील सोमप्पा, आई लिंगुबाई यांच्या पोटी १५ फेब्रुवारी १९३८ मध्ये नागभीड येथे झाला. श्रम संस्कृतीचे लिंगायत घराणे असलेल्या नागभीडसारख्या निसर्गरम्य परिसरात अतिशय गरीब परिस्थितीत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे उच्च शिक्षण नागपूरला झाले. बी.ए., बी.एड., एम.एड., पीएच.डी, डी.लिट. असा त्यांचा शैक्षणिक प्रवास झाला. आधीपासूनच त्यांच्या ठायी प्रतिभा आणि परिश्रम यांचा सुरेख संगम झाला होता. नागपूरला विद्वत्तापूर्ण शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. फुटाळा येथील महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असताना आपल्याकडील विद्वतपूर्ण ज्ञानामृत त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रदान केले. महात्मा बसवेश्वरांचे समर्थक, अनुयायी म्हणून लोक त्यांना ओळखत असे.
‘वीरशैव साहित्याची’ ओळख त्या काळात विदर्भातील लोकांना नव्हती ती ओळख त्यांना व्हावी, म. बसवेश्वर आणि त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविणे हे बाबांचे ध्येय होते. त्यासाठी तत्कालीन नागपूर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अ. ना. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वीरशैव साहित्यावर संशोधन कार्य पूर्ण करावे आणि डॉक्टरेट पदवी मिळवावी, असा त्यांचा मानस होता. पण ज्या विषयाचे साहित्यच उपलब्ध नाही त्या विषयात डॉक्टरेट होता येणार नाही असे उत्तर त्यांना मिळाले. परंतु याच विषयात डॉक्टरेट मिळवावी असे ध्येयच त्यांनी मनाशी बाळगले होते. त्या काळात त्यांनी मराठी वीरशैव साहित्य संमेलन नागपूर येथे भरविले व संपूर्ण भारतातून वीरशैव साहित्य संकलित केले तसेच ताडपत्रावर लिहिलेले साहित्यसुद्धा त्यांना संमेलनाच्या माध्यमातून प्राप्त झाले. त्याचे मोठे प्रदर्शन सेवासदन येथील सभागृहात मांडले. अनेक हस्तलिखिते, ताडपत्रत्रावरील लेखन आणि संपूर्ण कन्नड, मराठी, हिंदी, तेलगू, तामील भाषांतील वीरशैव साहित्य येथील प्रदर्शनात ठेवले गेले. त्यामुळे वीरशैव साहित्य मोठ्य प्रमाणात विविध भाषांत उपलब्ध आहे, हे लोकांना कळले. या साहित्याची ओळख येथूनच विदर्भातील लोकांना झाली.
मराठी वीरशैव धर्मपंथ इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांवर महाराष्ट्रात पहिली पीएच.डी. पदवी डॉ. सुधाकरांनी प्राप्त केली. त्यानंतर अनेक भाषांतील वीरशैव साहित्य मराठी भाषेत भाषांतरित करण्याचे अतिशय मोलाचे कार्य त्यांनी केले. हे सर्व करताना प्रचंड परिश्रम, सतत अठरा अठरा तास त्यांनी आपला लेखनप्रपंच सुरू ठेवला. आज जवळ जवळ बासष्ट पुस्तके त्यांची लिहून प्रकाशित झाली आहेत. वीरशैव साहित्याची ओळख महाराष्ट्राला करून देणारे सुधाकरराव त्यांच्या कार्यामुळे वीरशैव साहित्याचे दिपस्तंभ ठरले.
एक यशस्वी शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य आणि पीएच. डी. चे मार्गदर्शक असा त्यांचा शैक्षणिक प्रवास होता. जे ज्ञान आपण जीवनात मिळवले आहे त्या ज्ञानाचा उपयोग इतरांसाठी व्हावा यासाठी नूतन आदर्श महाविद्यालय, उमरेड येथे काही वर्ष प्राध्यापकाची नोकरी करतांना नागपूरच्या जवाहर नाईट शाळेत हेडमास्तर म्हणून त्यांनी नोकरी केली आणि दिवसरात्रा विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे दिले. त्यामुळे रात्राशाळेत शिक्षण घेणारे त्यांचे अनेक चाहते विद्यार्थी निर्माण झाले. त्यानंतर बाबांनी १९८२ मध्ये गोकुलपेठ येथे गाडगे महाराज नाईट हायस्कूल सुरू केले. दिवसा नोकरी केल्यानंतर रात्राशाळेत शिक्षण घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडविण्याची विद्यार्थ्यांची स्वप्ने बाबांनी रात्राशाळेच्या रुपाने पूर्ण केली. त्यानंतर १९९२ साली हिंगणा येथे संत गाडगे महाराज महाविद्यालय सुरू केले. त्या काळात हिंगण्यात पदवीचे शिक्षण घेण्यासाठी कोणती सोय उलब्ध नव्हती खेड्यातील गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. शिक्षण घेण्यासाठी त्याला शहरात पायपीट करावी लागू नये म्हणून गाडगे महाराजांच्या या अनुयायाने हिंगणा येथे वेणा नदीच्या पवित्रा संगमावर ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. आज या महाविद्यालयाचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेत अडीच हजार विद्यार्थी येथे पदवीपर्यंत शिक्षण घेत आहेत. याशिवाय, गाडगे महाराज माध्यमिक शाळा, ओंकार पब्लिक स्कूल येथे सुरु आहे.
जे कष्ट आपण शिक्षण घेण्यासाठी भोगले आहे ते कष्ट खेड्यातील विद्यार्थ्यांना होता कामा नये, महाविद्यालयाचे प्राचार्य पदावर कार्यरत असतांना सर्व शाखांना समान मानसन्मान, आर्थिक सहाय्य, मनुष्यबळ, शिस्तबद्धता, वेळेचे निष्ठेने परिपालन त्यांनी केले, कार्य करण्यासाठी एक आदर्श व्यवस्था त्यांनी महाविद्यालयात अस्तित्वात आणली.
त्यांच्या सांधिक आणि वैयक्तिक संशोधन योजनांमुळे नव्या क्षेत्रातील अनेक वीरशैव धर्मात महत्त्वपूर्ण ग्रंथ निर्माण झाले. त्यामुळे वीरशैव साहित्याची ओळख लोकांना झाली व वीरशैव साहित्यावर अनेक संशोधकांनी डॉक्टरेट मिळविली. डॉ. सुधाकररावांचे या सर्व कार्यात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान होते. महाराष्ट्रात वीरशैव साहित्यावर आज तीस लोकांनी डॉक्टरेट ही पदवी मिळवीली आहे. याशिवाय म. बसवेश्वरांच्या कार्याची ओळख महाराष्ट्राला व्हावी यासाठी १९८२ साली तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. बी. डी. जत्ती यांच्या हस्ते महाराष्ट्रात पहिला म. बसवेश्वरांचा पुतळा सुभेदार लेआऊट येथे त्यांनी बसविला
डॉ. सुधाकरराव हे आदर्श प्राध्यापक होते. विद्यार्थ्यांचे ज्ञानक्षितिज विस्तारित करणारे ते महान ज्ञानदाताही होते. सखोल अध्ययन, गंभीर चिंतन, प्रगल्भ वैचारिकता, निमग्न करणारी आकर्षक निरुपण शैलीयुक्त शिकवणी ऐकणे ही विद्यार्थ्यासाठी एक पर्वणी होती. विद्यार्थ्यांना शिकवतांना मंत्रामुग्ध करणे, तन्मय करणे ही अपूर्व कला त्यांनी आत्मसात केली होती. त्यांचे अध्यापन केवळ पाठ्पुस्तकातील विषयांशी सीमित नव्हते तर पाठविषय केंद्रस्थानी ठेवून या अंतर्गत येणाऱ्या अनेक विषयाची अभ्यासपूर्ण चर्चा त्यांच्या अध्यापनात येत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक नव्यानव्या विषयाचा परिचय होत असे. त्यातून त्यांना पुढील उन्नत संशोधनाच्या अनेक वाटा आढळत असत त्यामुळे कोणताही विद्यार्थी त्यांचे तास कधीच चुकवत नसे.
डॉ. सुधाकरराव समर्थ मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणे म्हणजे संशोधकाच्या जीवनातील महाभाग्य होते. परंतु त्यांच्याकडून संशोधन मार्गदर्शन मिळणे सोपे नव्हते. कारण त्यांनी निवडलेल्या विषयाची गंभीरता, त्यासाठी करावयाची कठीण परिश्रमाची तयारी, नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचा निर्वध हे सर्व अंगीकारायची शक्ती असलेले त्यांच्याजवळ प्रवेश घेत असे. कोणताही दगड असला तरी त्यांच्या हातातून तो सुंदर मूर्ती होऊनच बाहेर निघत असे. कोणताही विद्यार्थी त्यांच्याकडे सहाय्य मागण्यास आला; तरी कोणताही भेदभाव न करता त्यांना अगदी प्रेमाने सल्ला देणे, मार्गदर्शन करणे, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभ चिंतणे हे डॉ. सुधाकररावांचे विद्यार्थिप्रेम अनुकरणीय असे होते.
त्यांचे लिखाण खूप शिस्तबद्ध, सूत्रावद्ध होते. शास्वाशुद्धता हे त्यांचे प्रमुख लक्षण होते. प्रमाणबद्ध वाक्यरचना त्यांच्या गद्य लेखणात एक प्रकारची गेयता, शास्त्रा रचनेतही सर्जनशिलता, सातत्य, साहित्य वाचताक्षणी हे केवळ त्यांचे लिखाण आहे हे वाचणाऱ्याला कळत असे.
बाबा हे योजनाचे महायोजक होते. त्यांचे मस्तक म्हणजे योजनेचे भांडारच होते. नित्य नव्या नव्या योजना आखून नियोजनबद्ध वेळेत व्यवस्थितपणे त्या पूर्ण करणे. दुसऱ्यांनी अनुकरण करावे असा आदर्श निर्माण करण्याची कला त्यांना अवगत होती. कोणतीही योजना त्यांनी हाती घेतली त्यात ते स्वतः पूर्णपणे समर्पित होत असत. त्यासोबत श्रद्धा, श्रम, संकल्प यांना सामावून नियोजित वेळेत शिस्तबद्धपणे ती योजना ते पूर्ण करीत असे.
डॉ. सुधाकर मोगलेवार हे दक्ष प्रशासक, संशोधक, शिक्षणतज्ञ, मार्गदर्शक बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, विदर्भगंगा साप्ताहिकाचे संपादक, वीरशैव साहित्य विश्वकोशाचे जनक, महाराष्ट्र विदर्भ प्रादेशिक वसव समितीचे अध्यश्न तसेच सुप्रसिद्ध वीरशैव साहित्यिक, वीरशैव साहित्याचे गाढे अभ्यासक इत्यादी महत्त्वाच्या भूमिका त्यांनी जिवनात वठविल्या त्यांनी केलेले कार्य चिरस्मरणीय असे आहे.
ते कधीही अधिकार प्रिय नव्हते. ते अधिकाराचा अहंकार बाळगणारे सुद्धा नव्हते. प्रामाणिकपणे सेवा करून कालावधी संपताच ते आपल्या पदाचा त्याग करीत, एकाच जागी एक व्यक्ती न राहता दुसऱ्यांना संधी देणे हा त्यांचा सिद्धांत होता.
बाबा उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी केलेले प्रदीर्घ लेखन, त्याविषयी केलेले चिंतन, त्यांची शैक्षणिक शिस्त, दूरदृष्टी, अमूल्य विचारशक्ती दाखवून देतात. त्यांना आपल्या लिंगायत समाजाविषयी अभिमान व आस्था होती म्हणून त्यांची महाराष्ट्र लिंगायत समाजाच्या चळवळीला तेजोमय करण्याचे कार्य त्यांनी केले.
महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठी वीरशैव साहित्य मंडहाचे अध्यक्ष असतांना अखिल भारतीय स्तरावर महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात म. बसवेश्वर वीरशैव साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन त्यांनी केले. त्यामुळे वीरशैव लिंगायत साहित्याला चालना
मिळाली. मोठ्या प्रमाणावर वीरशैव लिंगायत साहित्याची निर्मिती झाली. वीरशैव साहित्य महाराष्ट्रातील लिंगायत समाजापर्यंत पोहोचले. त्यांच्या या बसव कार्यामुळे लिंगायत समाज चेतनामय झाला. एवढेच नव्हे तर वीरशैव समाजबांधवांसाठी “वीरशैव विश्वकोष भाग १, २, ३ यांची निर्मिती त्यांनी केली. त्यांचे हे कार्य हिमालयाच्या उंचीचे होते. मराठी वीरशैव विश्वकोषाचे ते जनक झाले. त्यांच्या या महान कार्यामुळे भारतातील वीरशैव जनतेने त्यांना ‘बसवपंडीत’ ही पदवी प्रदान केली.
बाबाचे व्यक्तिमत्त्व कल्पनातीत, शब्दातीत असे आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी, शरण संस्कृतीचे आचरण करणारे स्पष्ट वक्ते, निःस्पृहता आणि सौजन्यता ही त्यांची स्वभावजन्य वैशिष्ट्ये. असत्य, अन्याय, अप्रामाणिकपणा, कपट, फसवेगिरी ते कधीही सहन करीत नसत. त्यांच्या स्पष्टतेमागील तळमळ लक्षात घेता त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील महानता लक्षात येते. त्यांच्याविषयी आपणहून आदरभाव व्यक्त होतो.
बाबांचे जीवन अत्यंत शिस्तबद्ध आणि तत्त्वबद्ध होते. त्यांच्याशी त्यांनी कधी प्रतारणा केली नाही. वेळखाऊ धोरण त्यांच्या जवळपासही फिरकत नाही. सर्व कार्य वेळेतच पूर्ण व्हावे हे त्यांचे धोरण होते. आजचे काम आजच पूर्ण करून उद्या दुसरे काम हाती घ्यावे हे त्यांचे तत्त्व होते. परिश्रम करणाऱ्यांचे मन आरोग्यमय असते ही बाबांची वाणी. सदैव कार्यात मग्न असल्यामुळे कोणताही आजार त्यांच्या जवळ फिरकला नाही.
त्यांनी केलेल्या अफाट कार्यामुळे त्यांच्या उत्तुंग कार्याच्या गौरवार्थ अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आपल्या जीवनात अनेक अग्निकुंड पार करून आयुष्याची मजल-दरमजल त्यांनी गाठली आहे. ‘सुख येवो दुःख येवो’ कशासही न घाबरता ते स्थितप्रज्ञ होते.
—————




