Breaking
Breaking

0 2 0 2 9 1

 यह तो होना ही था !

  मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. मुंबईचे आर्थिक बजेट हे भारतातील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम ,त्रिपुरा, गोवा या राज्यांच्या बजेट पेक्षा जास्त आहे. २०२४ – २५ या आर्थिक वर्षासाठी हे बजेट ५९ हजार ९५५ कोटी रुपयाचे होते. तर २०२५ – २६ साठी हे अंदाजे ७४ हजार कोटी चे वर प्रस्तावीत आहे. 

     अशा श्रीमंत महानगरपालिकेवर सत्ता असणे हे प्रमुख राजकीय पक्षासाठी भूषणावह असू शकते. या मुंबई महानगरपालिकेवर १९९७ ते २०२५ या २८ वर्षाच्या कालखंडात शिवसेनेची सत्ता होती. प्रामुख्याने मराठी माणूस , मराठी माणसाची अस्मिता यावर शिवसेनेचे राजकारण आधारीत आहे. त्यामुळे मुंबई ही मराठी अस्मितेचे शिवसेनेच्या राजकारणाचे व ठाकरे कुटुंबीयांच्या प्रभावाचे केंद्र मानले जाते.

 ‌‌नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिंदेसेना यांच्या महायूतीने एकूण २२७ जागापैकी भाजपा ८९ व शिवसेना शिंदे गट २९ अशा एकूण ११८ जागा मिळवीत बहुमता एवढे यश संपादन केले, व जवळपास २८ वर्षापासून मुंबई वर सत्ता गाजविणाऱ्या ठाकरे कुटुंबीयाची सत्ता संपुष्टात आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला ६५ तर राज ठाकरेंच्या मनसेला ६ जागा मिळाल्या.

  मराठी बाणा व मराठी अस्मिता हा मुद्दा करून निवडणूक लढविणाऱ्या ठाकरे बंधूंना मतदारांनी सीमित यश दिले, पण सत्ता नाकारून मराठी अस्मिता हा मुद्दा आता तेवढा प्रभावी ठरत नाही याची जाणीव करून दिली. किंबहुना ठाकरे बंधू मराठी अस्मितेचा मुद्दा केवळ निवडणुकीपुरताच वापरतात अन्यथा त्यांच्या कृतीतून त्याचे समर्थन केलेले कधीही दिसले नाही. असा जणू संदेशच या मतदानातून व्यक्त केला आहे. 

  बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत   

 उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा झालेला हा पराभव अनपेक्षित नव्हता तर तो अपेक्षितच होता. मराठी माणूस अद्यापही आपल्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे हा उद्धव ठाकरेंच्या भ्रमाचा भोपळा मतदारांनी काही प्रमाणात फोडला आहे. उद्धव ठाकरेंसाठी हे अनपेक्षित असेलही कदाचित परंतु उद्धव सेनेने भाजपची साथ सोडून नंतर केलेली वाटचाल पाहता हे अनपेक्षित नव्हते. हे केव्हा तरी घडणारच होते, आणि खरे म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे नी सत्तेसाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली, तेव्हाच भविष्यातील या घटनेची निश्चिती झाली होती. उबाठाच्या पराभवाची अन्य अनेक कारणे सांगता येण्यासारखी असली तरी माननीय बाळासाहेबांच्या विचाराशी व ध्येय धोरणाशी घेतलेली फारकत हेच पराभवाचे मुख्य कारण आहे. 

  सत्तेसाठी उबाठाने बाळासाहेब ठाकरेच्या धोरणांशी विसंगत असलेल्या राजकीय विचारधारेच्या पक्षांशी केलेला संग हा मतदारांना रुचला नाही.त्यामुळे मराठी अस्मिता जपणाऱ्या व बाळासाहेबांना आदरणीय मानणाऱा मतदार उद्धव सेनेपासून दूर गेला. त्यामुळे नवीन मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात म्हणा की नादात म्हणा उद्धवसेना कधी मुस्लिमांना झूकते माप देवू लागली हे त्यांचे त्यांना स्वतःलाही कळले नाही. पण मतदारांना मात्र हे जाणवत होते. 

                   उबाठा सेनेचा दरारा राहिला नाही.

 १९९१ साली छगन भुजबळ आपल्या सहा आमदारासह सेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. पण अनेक दिवस ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भीतीने संरक्षणात व दडपणाखालीच वावरत होते, असे त्यावेळच्या परिस्थितीवरून जाणवत होते. मात्र शिंदे नी शिवसेनेची जी दोन शकले केली तेव्हा बाहेर पडणारे आमदार उद्धव शिवसेनेच्या कोणत्याही दडपणात नव्हते. हा शिवसेनेचा दरारा कमी झाल्याचे द्योतक होते. छगन भुजबळ, व नारायण राणे यांनी सेना सोडली. मात्र ते बाळासाहेबांना आपण अद्यापही मानतो असे जेव्हा आदराने म्हणतात तेव्हा त्यात त्यांचेवर असणारा बाळासाहेबांच्या विचारांचा , कर्तुत्वाचा प्रभाव व त्यांचे विषयीचा आदर दिसतो. मात्र असा कोणताही आदरभाव शिंदे सोबत गेलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरे बद्दल व्यक्त केल्याचे अथवा त्यांच्या बोलण्यातून दिसल्याचे अथवा व्यक्त झाल्याचे जाणवले नाही. यातच उद्धव ठाकरेच्या संघटनेवरील प्रभावी नेतृत्वाचे व संघटन कौशल्याचे अपयश दडले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

         मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात अपयश 

 मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रचाराचे वेळी आपण जिंकून आल्यास कोणत्या योजना, कोणते प्रकल्प जनतेच्या हितासाठी राबवू ही बाब जनतेच्या मनावर बिंबविण्यात उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही असे म्हणावे लागेल. मुंबईतून मराठी माणसाचा टक्का कमी होतोय अशी हाकाटी देताना उबाठाने आपण आपल्या कारकिर्दीत किती मराठी माणसांचे हित साधले, किती मराठी जनतेला रोजगार उपलब्ध करून दिला, किती मराठी माणसांच्या विकासाच्या योजना राबविल्या व त्याचा लाभ किती मराठी माणसांना झाला याची पूर्ण सविस्तर माहिती जाहीर करून स्वतःचा मुद्दा प्रभावी करण्याची संधी साधली नाही. या उलट विरोधकांना टोमणे मारणे, (जर माध्यमा वर आलेला व्हिडिओ ” जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणेन मध्ये सत्यता असेल ” तर ) हिंदूंच्या आस्थे विषयीच्या संदर्भात विवादित विधाने करणे अशा प्रकारची वक्तव्ये करून उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या हितचिंतकांची संख्या कमी केली. बाळासाहेबांच्या बोलण्यातील दरारा, प्रभाव उद्धव ठाकरे किंवा ” मी त्यांचे सोबत काम केले मला सांगू नका ” असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्या बोलण्यात कधीच जाणवला नाही जाणवले ते फक्त टोमणे. 

ठाकरे बंधूच्या युतीचा फायदा कोणाला ?

 ठाकरे बंधूंची युती व्हावी असे अनेकांना वाटत होते. या युतीचा उद्धव ठाकरे गटाला किती फायदा झाला हे निश्चित सांगता येणार नाही मात्र अनेक ठिकाणी झिरो असणाऱ्या मनसेचे मुंबईत ६ व अन्यत्र. ७ असे एकूण १३ नगरसेवक निवडून आल्याने मनसेला प्रत्यक्षदर्शी फायदा झाला असे म्हणता येते. राज आणि उद्धव ठाकरे यांची युती ही भाजपाच्या पथ्यावर पडली. कारण राज ठाकरे च्या पूर्व परिचीत राजकीय धोरणामुळे त्याचे महाविकास आघाडीतील अन्य पक्षाशी विशेषतः काँग्रेसशी जुळणे शक्य नव्हते. म्हणजेच उद्धव व राज ठाकरे यांची युती झाल्यास महाविकास आघाडीत फूट पडणार , तसेच परप्रांतीची मते ही उद्धव ठाकरे पासून दुरावणार , हे भाजप जाणून असल्याने ठाकरे बंधूंची झालेली युती ही भाजपाला फलदायी ठरली. महाविकास आघाडी एकत्रित लढली असती तर उबाठाच्या दृष्टीने निकालावर बराच सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता होती असे म्हणण्यास वाव आहे.

     ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या चर्चा, एकत्र येण्यासाठी झालेला उशीर यांच्या एकत्रित येण्यामुळे महाविकास आघाडीत झालेली फूट, मुंबईला महत्व दिल्यामुळे अन्य ठिकाणी प्रचारासाठी झालेले दुर्लक्ष, स्टार प्रचारकांचा अभाव, अशा सगळ्या अडचणीवर मात करूनही मुंबईत उबाठाने दिलेली लढत व जिंकलेल्या ६५ 

जागा व मनसेने जिंकलेल्या सहा जागा ह्या निश्चितच पक्षांसाठी कौतुकास्पद व पक्षाचे मनोबल टिकविणाऱ्या आहेत. परंतु आता राज्यात किंवा मुंबई महानगरपालिकेत सत्ता नसल्याने अखेरपर्यंत किती नवनिर्वाचित नगरसेवक पक्षात टिकून राहतात अथवा कितीजण सत्तेच्या लालसेने अन्य पक्षांशी जवळीक साधतात. हे येणारा काळच ठरवेल.

    परंतु संघटना रुपी इमारतीचा मूळ पाया असलेली बाळासाहेबांची ध्येय व धोरणांचा मुद्दाच डळमळीत झाला असल्यास इमारत मजबूत कशी राहणार ? मधून मधून तिला फूट रूपी तडे जाण्याची शक्यताच जास्त असते. त्यामुळेच मुंबईची सत्ता हातून जाणे हा निकाल अनपेक्षित नव्हता तर, ये तो होना ही था !          

भालचंद्र ठोंबरे, पुणे

९८३४३५०८९५

—-_————-

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 2 9 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे