Breaking
महाराष्ट्र

इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय ? डॉ. महेंद्रकुमार मुरलीधर मेश्राम   

0 2 0 2 9 4

इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय ?


✒️ डॉ. महेंद्रकुमार मुरलीधर मेश्राम                                                                                प्राचार्य, ऑरेंज सिटी कॉलेज  ऑफ सोशल वर्क, नागपूर.

मो. ९९७५६६५८६२*

दिवाळीच्या सुट्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील काही महत्वाच्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन आलो. पूर्वेकडे सह्याद्रीच्या उंचउंच अशा अतूट रांगा, पश्चिमेला पसरलेला अथांग अरबी समुद्र, या दोन परिसीमांमधील लहानमोठ्या दऱ्या आणि त्यांमध्ये दूरवर पसरलेले समुद्र खाड्यांचे पाणी, हिरवीगार दाट वनश्री, नारळी-पोफळीच्या बागा अशा निसर्गरम्य देखाव्यांनी रत्नागिरी जिल्हा नटलेला आहे. पर्यटकांना मोहिनी घालतील अशी अनेक रमणीय स्थळे जिल्ह्यात ठिकठिकाणी आढळत असल्याने ती पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक जिल्ह्यात येतात.

रत्नागिरी जिल्हा

‌रत्नागिरी जिल्हा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे, माता रमाबाई आंबेडकर यांचे जन्मस्थान वणंद, लोकमान्य टिळक यांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध असलेला, वि. दा. सावरकर आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या प्रभावशाली व्यक्तिमत्वांशीही जोडलेला जिल्हा आहे. हे प्राचीन क्षेत्र अनेक राजघराण्यांच्या अधीन राहिले. सातवाहन कालखंडात, पन्हाळकाजी लेणी बौद्ध धर्माच्या अध्ययन आणि प्रसाराचे केंद्र म्हणून वापरली जात होती. रत्नागिरी हे तीन भारतरत्नांचा प्रदेश म्हणूनही ओळखले जाते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पी. व्ही. काणे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे! याशिवाय, ब्रह्मदेशाचे राजा थिबा ब्रिटिश सरकारकडून रत्नागिरीत कैदेत ठेवले गेले होते.

रत्नागिरीचा इतिहास ख्रिस्तपूर्व काळात जाऊन पोहोचतो, जेव्हा हे क्षेत्र विविध बौद्ध आणि हिंदू राजघराण्यांच्या अधीन होते. मौर्य साम्राज्य हे या प्रदेशाचे पहिले ज्ञात शासक होय, त्यानंतर विविध हिंदू शासकांनी राज्य केले, त्यामध्ये देवगिरीचे यादव हे या प्रदेशाचे शेवटचे मुस्लिम नसलेले राजघराणे होते. दीर्घकाळ चाललेल्या लष्करी संघर्षानंतर मुस्लिम शासकांनी या क्षेत्रावर ताबा मिळवला, आणि दिल्ली, बहमनी, दख्खन आणि नंतर मुघल साम्राज्याच्या अधीन हा प्रदेश राहिला. पोर्तुगीझांनी मुसलमान शासकांसोबत लढाया केल्या, आणि कोकण किनाऱ्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. १६५८ मध्ये, मराठा साम्राज्याने या क्षेत्रावर आपला ताबा घेतला होता.

संगमेश्वर

रत्नागिरी जिल्ह्यातल्या ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं ‘संगमेश्वर’ हे आता ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखलं जातं. ‘कसबा संगमेश्वर’ म्हटलं की, नजरेसमोर येतात, छत्रपती संभाजी महाराज! छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे स्वारी करून विजापूरकरांचे अंकित सरदार शिर्के, दळवी, सुर्वे, सावंत, मोहिते इ.चा पराभव करून मराठी राज्याची सत्ता स्थापन केली होती. संभाजी महाराज कैद केले गेले ते याच कसबा संगमेश्वरमध्ये आणि संगमेश्वरचं नाव एका दु:खद, संतापजनक व तितक्याच दुर्दैवी घटनेनं इतिहासात नोंदलं गेलं. मराठी राज्यामध्ये या भागाची महसूल व्यवस्था ज्या सरदेसाई घराण्याकडे होती, त्या सरदेसाई घराण्याचे वंशज आजही कसब्यात आहेत. ज्या सरदेसाईच्या वाडय़ामध्ये संभाजी महाराज शेवटचे वास्तव्यास राहिले, त्या वाडय़ाच्या खाणाखुणा, त्याच्या मागील बाजूस असलेली काही शिल्प, भग्नावस्थेतली काही मंदिरं आजही त्या घटनेची साक्ष देतात!

छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आजही इथे इतिहासाची साक्ष देणारी आहे. महाराजांच्या त्याग, शक्ती, आणि अलौकिक शौर्याचा साक्ष असणारे संगमेश्वर ‘फितुरी’ या शब्दाचा जिवंत इतिहास कथन करते तेव्हा संवेदनशील माणसाच्या डोळ्यातून प्रचंड दुःख आणि वेदनेने भरलेले अश्रू आपोआप वाहू लागतात.

सरदेसाई वाडा

संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा. ३ फेब्रुवारी १६८९ रोजी याच वाड्यातून नावडी बंदराकडे जाताना मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले. ही जागा नव्हे तर ही घटना दुर्दैवी आहे. संगमेश्वर आणि जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी महाराजांचे वास्तव नेहमी असे. उन्हाळ्यात ते या भागात आल्यावर या सरदेसाईच्या वाड्यात उतरत. पन्हाळगडावरून रायगडला जाताना १ फेब्रुवारी रोजी संभाजी महाराज संगमेश्वरला या वाड्यात मुक्कामाला आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी अर्जाजी व गिरजोजी यादव यांच्या वतनाचे न्यायनिवाडे इथे केले. औरंगजेबाने पाठवलेला मुघल सेनापती शेखनिजाम मुकर्रबखान कोल्हापूरहून सैन्य घेऊन ३ फेब्रुवारीला संगमेश्वरला आला आणि बेसावध असलेल्या संभाजी महाराजांवर हल्ला केला. संभाजी महाराजांनी नावडी बंदराकडे आगेकूच करावी असे सांगून मालोजी बाबा घोरपडे यांनी येथे मुघलांशी वाऱ्याच्या वेगाने कडवी झुंज दिली. संताजी व बहिर्जी घोरपडे यांना रायगडाकडे जायला सांगून मुघली सैन्यावर तुटून पडत सिंहासारखे लढत नावडी बंदराकडे जाताना मुघलांनी संभाजी महाराजांना कैद केले. संभाजी महाराजांच्या कैदेनंतर शेखनिजामाने हा सरदेसायांचा वाडा जाळला आणि गावातली देवळे फोडली असे उल्लेख सरदेसाई यांच्या कागदपत्रात आहे. कैदेत पडण्याच्या आधी संभाजी महाराजांच्या शेवटच्या आठवणीचा साक्षीदार म्हणजे हा सरदेसाई वाडा. आम्ही, दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सरदेसाई वाड्याला भेट दिली. वाड्याजवळ राहत असलेले सीताराम धोंडू आमरे या ८६ वर्षाच्या वृद्धाने आम्हाला बरीच माहिती दिली. तरुणालाही लाजवेल असा उत्साह त्यांच्यात होता. ते तेथे येणाऱ्यांच्या नोंदी स्वेच्छेने ठेवतात. माहिती देतात. ‘छावा’ सिनेमामुळे हा वाडा प्रकाशझोतात आला. उपेक्षिताचे जीने याही वाड्याला लाभले.

संभाजी महाराजांशी फितुरी कुणी केली ? शेखनिजाम मुकर्रबखान याला महाराजांची माहिती कुणी दिली ? याविषयी अनेक मत-मतांतरे, तर्क-वितर्क, वादविवाद आहेत. इतिहास तज्ञांमध्ये मतभेद आहेत. नेमके खरे काय ? हे सांगता येत नाही. मात्र, फितुरी झाली हे खरे आहे.

प्रस्तुत लेखक हे इतिहासाचे विद्यार्थी, अभ्यासक किंवा तज्ञ नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला छावा सिनेमा नुकतात प्रदर्शित झाला. छावा सिनेमा डोळ्यासमोर ठेऊन प्रस्तुत लेखप्रपंच केला आहे. त्यामुळे यातील प्रसंग व घटनांच्या सत्यतेबाबत लेखकाचा अजिबात दावा नाही. ‘छावा’ हा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या मराठी कादंबरीवर आधारित आहे. गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचं छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी जवळचं नातं होतं, तरी देखील त्यांनी वतनासाठी महाराजांसोबत गद्दारी केली.

काय आहे भोसले आणि शिर्के घराण्याचं नातं?

शहाजीराजेंपासून शिर्के घराणं भोसले घरण्यासोबत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कन्या राजकुंवरबाई यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गणोजी शिर्केंसोबत केला होता. तर साटंलोटं करत पिलाजीरावांच्या कन्या येसूबाईंचा विवाह संभाजी महाराजांसोबत झाला होता. थेट छत्रपतींच्या घराण्यासोबत शिर्के घराणं जोडलं गेलं होतं.

वतनाची मागणी

शिर्केंकडून सतत वतनाची मागणी करण्यात येत होती. शिर्के यांनी महाराजांना दाभोळचं वतन मागितलं होतं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना वतनदारी मान्य नव्हती. हेच संभाजी महाराजांनीही पुढं नेलं. वतन देण्यात शंभूराजेंचाही विरोध होता.संभाजीमहाराजांच्या राज्याभिषेकला अनेकांचा विरोधही होता, मात्र या काळात शिर्केंनी महाराजांना मदत केली होती. पण त्यांचा वतन मिळावा हा हट्ट, ही मागणी कायम राहिली.

कट कारस्थान

संभाजी महाराजांना गादीवरून खाली उतरवण्यासाठीही अनेक कट कारस्थानं झाली. संभाजी राजेंना गादीवरून हटवायचं आणि शाहू महाराजांना छत्रपती करायचं… असा त्यांचा कट होता. या कटाबद्दल जेव्हा संभाजी महाराजांना कळालं तेव्हा त्यांनी शिर्केंवर हल्ला केला. यावेळी महाराणी येसूबाईंचाही त्यांना पाठिंबा होता. स्वराज्यासमोर कोणतंही नातं मोठं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या सगळ्यात महाराजांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे कवी कलश यांच्यावरून शिर्केंमध्ये नाराजी होती. शिर्केंकडून कवी कलश यांच्यावर अनेक आरोप झाले, पण यात महाराजांनी शिर्केंची बाजू न घेता कवी कलश यांची बाजू घेतली. हे खटकल्यानं शिर्केंनी मुघलांना जवळ केलं.

महाराजांचा घात झाला

मुकर्रब खानाला काहीही करून संभाजी महाराजांना पकडायचं होतं. त्यानं गणोजी आणि कान्होजी यांना वतनदारीचं आमिष दाखवून महाराजांबद्दल विचारलं. रायगडावर निघालेले संभाजी महाराज संगमेश्वरात सरदेसाई वाड्यात थांबले होते. या गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी मुकर्रब खानाला आंबाघाटाची वाट दाखवली. इतकंच नाही तर महाराज कुठं आहेत, याची माहितीही त्यांनी मुघल सैन्याला दिली. यांच्या मदतीनेच स्वराज्याचे छत्रपती मुघलांच्या हाती लागले, हाच तो इतिहासातील काळा दिवस ठरला.  छत्रपती संभाजीराजांचं संपूर्ण जीवन संघर्षाने भरलेलं होतं. मुघल, सिद्दी जोहर या स्वराज्याच्या शत्रूंबरोबरच त्यांना घरातल्या म्हणजे स्वराज्यातल्या लोकांबरोबरही संघर्ष करावा लागला. या घरभेद्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना संपवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण हा शिवपुत्र प्रत्येक वेळी नव्या ताकदीने उभा राहिला. जर छत्रपती संभाजी महाराजांना फितुरांशी संघर्ष करावा लागला नसता तर यापेक्षा अधिक दैदीप्यमान इतिहास त्यांनी घडवला असता. लहानपणी मातृछत्र हरपलं. त्यांच्या जाणत्या वयात दरबारातल्या स्वराज्यद्रोह्यांनी वडिलांशी म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांशी दुरावा घडवून आणला. अशा असंख्य प्रसंगांतून तावून सुलाखून निघालेल्या संभाजीराजांचं ‘दिव्यत्व’ अधिक सामोरं आलं. अखेर फितुरीनं या लोकविलक्षण राजाचा घात केला.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची अखेरची लढाई :-*

छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश हे राजकीय कारणासाठी संगमेश्वरातून रायगडावर परत जात होते. यावेळीच औरंगजेबाच्या सैन्याने संभाजी महाराजांवर हल्ला केला आणि त्यांना आपल्या ताब्यात घेतलं. पण हा स्वराज्यरक्षक सहजासहजी मुघलांच्या हाती लागला नाही. छत्रपती संभाजी महाराज मित्र कवी कलशाच्या साथीनं वाघासारखे या सैन्यावर तुटून पडले. संभाजीराजांना ताब्यात घेतल्यानंतर औरंगजेबानं क्रूरतेच्या आणि अमानुषतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. छत्रपती संभाजीराजे यांना औरंगजेबानं धर्म परिवर्तन करण्यास सांगितलं, मात्र त्यांनी नकार दिला. यानंतर औरंगजेबानं त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्यानं महाराजांची जीभ कापली, डोळे काढले, संपूर्ण शरीर सोलून काढलं. तब्बल चाळीस दिवस पराकोटीचा छळ निडरपणे सहन केल्यानंतर स्वराज्याच्या या तेजस्वी छत्रपतीची प्राणज्योत मालवली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाचे तुकडे तुळापूरच्या नदी काठावर फेकले गेले. ज्या भीमा इंद्रायणीने शंभू राजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा शंभू राजांचा विखुरलेला देह पाहत होती. शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होते.

छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार

छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे शिवून त्यावर अंत्यसंस्कार गोविंद गोपाळ महार यांनी केले. औरंगजेबाने महाराजांच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिले होते, त्यावेळी कोणीही पुढे येण्यास धजावत नव्हते. अशा कठीण परिस्थितीत, गोविंद गोपाळ महार यांनी धाडस करून ते तुकडे गोळा केले, शिवले आणि वढू (बुद्रुक) येथे त्यांचे अंत्यसंस्कार केले. त्यामुळेच आज वढू येथे संभाजी महाराजांची समाधी आहे. संभाजी महाराजांचा मृत्यू तारखेनुसार ११ मार्च १६८९ रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीत एका वैशिष्ट्याची दखल इतिहासानं घेतली आहे. पित्यानं स्वाभिमानानं कसं जगावं, हे शिकवलं. तर सिंहाच्या ‘छाव्या’नं स्वाभिमानासाठी मृत्यूला ओशाळायला कसं लावावं, हे आपल्या बलिदानानं दाखवून दिलं.

इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय?

दि. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण या देशातील सर्वांनीच वाचले पाहिजे. बाबासाहेब आपल्या विद्वत्तापूर्ण व देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या ऐतिहासिक भाषणात म्हणतात, …..याठिकाणी मी माझे भाषण संपविले असते, परंतु माझे मन देशाच्या भविष्याबाबत इतके चिंताग्रस्त आहे की, त्यासंबंधातील माझी मते व्यक्त करण्यासाठी या प्रसंगाचा मी उपयोग करावे असे मला वाटते. २६ जानेवारी १९५० रोजी भारत एक स्वतंत्र देश असेल (हर्शोल्लास). त्याच्या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवील की पुन्हा गमावून बसेल? हा माझ्या मनात येणारा पहिला विचार आहे. असे नाही की भारत हा यापूर्वी कधीही स्वतंत्र नव्हता. मुद्दा असा आहे की त्याने असलेले स्वातंत्र्य एकदा गमावले आहे. तो दुसऱ्यांदा ते गमावेल का? हा विचार मला भविष्याबद्दल सर्वात जास्त चिंताग्रस्त करतो. भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावले असे नव्हे, तर ते देशातील काही लोकांच्या बेईमानी आणि विश्वासघातामुळे गमावले गेले ही वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते. महंमद-बिन-कासीमच्या सिंधवरील आक्रमणात, राजा दहारच्या लष्करी सेनापतींनी महंमद-बिन-कासीमच्या एजंटांकडून लाचा घेतल्या आणि आपल्या राजाच्या बाजूने लढण्यास नकार दिला. जयचंद यांनीच महंमद घोरीला भारतावर आक्रमण करून पृथ्वीराजांविरुद्ध लढण्यासाठी आमंत्रित केले होते आणि त्यांना स्वतःच्या आणि सोलंकी राजांच्या मदतीचे आश्वासन दिले होते. जेव्हा शिवाजी हिंदूंच्या मुक्तीसाठी लढत होते, तेव्हा इतर मराठा सरदार आणि राजपूत राजे मोगल सम्राटांच्या बाजूने लढत होते. जेव्हा इंग्रज शीख राज्यकर्त्यांचा नि:पात करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांचा प्रमुख सेनापती गुलाब सिंग शांत बसला होता आणि शिखांचे राज्य वाचवण्यासाठी त्याने शिखांना मदत केली नाही. १८५७ मध्ये, जेव्हा भारताच्या एका मोठ्या भागाने ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध घोषित केले होते, तेव्हा शीख बघ्याच्या भूमिकेतून त्या घटनेकडे पाहत राहिले. इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय? याच विचाराने मी चिंताग्रस्त झालो आहे. जाती आणि पंथांच्या स्वरूपात आपल्या जुन्या शत्रूंव्यतिरिक्त, आपल्याकडे भिन्न आणि परस्परविरोधी विचारप्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांचीही भर पडणार आहे. भारतीय लोक आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मानतील? मला माहित नाही. पण हे निश्चित आहे की जर पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे गमावले जाईल. या घटनेपासून आपण सर्वांनी दृढनिश्चयाने सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा आपण दृढनिश्चय केला पाहिजे. (हर्षध्वनी)

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे जीवन, कार्य व संघर्ष अभ्यासताना आताच्या स्वराज्यातील फितुरी, दगाफटका, धोका, बेईमानी आणि विश्वासघात समजून घेतला पाहिजे. इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय? देश भयंकराच्या दरवाज्यात उभा आहे. देशाचे अस्वथ करणारे वर्तमान हे फितुरीने भरलेले आहे. शक्य तेवढ्या लवकर ही फितुरी व फितूर आम्ही ओळखले पाहिजे आणि संविधानाच्या शिल्पकारांनी दिलेला गर्भित इशारा ओळखून आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे. जाती-धर्माच्या नावावर होत असलेल्या कत्तलींनी भारतभूमी कलंकित होत असताना ‘फितुरी’ या शब्दाचा जिवंत इतिहास सांगणारे ‘कसबा संगमेश्वर’ हे गाव मात्र आता एकता, एकात्मता व बंधुतेचे आदर्श उदाहरण ठरले आहे. सीताराम धोंडू आमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या गावात हिंदू व मुस्लीम धर्माचे लोक एकत्र एकोप्याने राहतात. सण-समारंभ एकत्र साजरे करतात. कोणताही धार्मिक वाद नाही. गावाचे सरपंच पदाची टर्म दोन्ही धर्मियांनी आपसात वाटून घेतली आहे. मिळून-मिसळून निर्णय घेतात. धर्माच्या नावे विष पेरण्याचे काम येथे होत नाही. तेव्हा, ‘फितुरी’चा काळोख दूर होऊन बंधुता व समतेचा उजेड देशात सर्वत्र पसरविण्याचे संवाहन जलदगतीने घडो हीच सदिच्छा.

**************

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 2 9 4

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे