Breaking
देश-विदेश

रिक (RIC – Russia/India/China)च्या पुनरुज्जीवनातील अडचणी-फायदे-तोटे

0 2 0 2 9 1

रिक  RIC – Russia/India/China)च्या पुनरुज्जीवनातील अडचणी-फायदे-तोटे

रिक ट्रोईका ! रिक (RIC) म्हणजे रशिया, इंडिया, चायना, ट्रोईका म्हणजे तीन देशांची संघटना . म्हणून रशिया इंडिया व चायना या तीन देशांच्या संघटनेचे हे संक्षिप्त नांव आहे.१९९० च्या दशकात या संघटनेची स्थापना झाली. स्थापनेची मूळ कल्पना रशियाची होती. रशियाचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री येव्हगेनी प्रिमाकोव्ह यांनी अशा प्रकारच्या संघटनेचा विचार व्यक्त केला. अशा प्रकारच्या संघटनेमुळे या तीन जागतिक शक्तिशाली देशामध्ये राजकीय आर्थिक व सामाजिक सहकार्य वाढून बहु ध्रुवीय जागतिक सत्ता निर्मिती करण्यास मदत होईल, हा उद्देश होता. यासंदर्भात या देशांच्या बऱ्याच बैठकाही झाल्या. मात्र जून २०२० मध्ये भारत व चीन यांच्या दरम्यान उद्भवलेल्या सीमा वादा नंतर या संदर्भात बैठका झाल्या नाहीत. आणि पंधरा वर्षापासून बैठका नसल्याने संघटन जणू निष्क्रिय झाली आहे. मात्र आताही रशियानेच पुढाकार घेऊन रीकच्या पुनरूज्जीवनाचा मनोदय जाहीर केला आहे.

पुनरुज्जीवना मागील पार्श्वभुमी

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठी दुसऱ्या वेळेस निवडून आले. त्यावेळेसच त्यांनी यापुढील राजकारणात “अमेरिका प्रथम,” हे धोरण राबविल्या जाईल असे जाहीर केले. कोणत्याही राष्ट्र प्रमुखाने स्वतःच्या राष्ट्राच्या विकासाला व उन्नतीला प्राधान्य देणे यात गैर काहीच नाही. परंतु आपल्या ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी अन्य देशांना धमकावण्याचे धोरण सुरू केले. जी राष्ट्रे आपले म्हणणे ऐकणार नाहीत त्यांच्या बाबतीत आपण अतिरिक्त आयात शुल्क आकारू अशी त्यांनी कल्पना देऊन तसेच याबाबत काही राष्ट्रांना लेखी सूचना देऊन एक प्रकारे टैरिफ युद्धाला सुरुवात केली आहे. युक्रेन रशिया युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेने रशियावर आर्थिक बंधने लादली होती. तसेच रशियाकडून तेल व गॅसच्या संदर्भात कोणीही व्यवहार करू नये अशी बंधने अन्य देशावरही घातली. असे असतानाही तेव्हा भारताने रशियाकडून तेल व गॅस स्वस्त दरात मिळत असल्याने व्यापार सुरू ठेवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणुकीचा प्रचार करताना आपण पुन्हा राष्ट्रपती झाल्यास युक्रेन रशियामधील युद्ध पंधरा दिवसात थांबावू अशी वल्गनाही केली होती. मात्र त्याप्रमाणे घडले नाही.

तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, भारत व ब्राझील यांच्यावर युक्रेन रशिया युद्ध थांबविण्यासाठी रशियावर दबाव आणावा अन्यथा त्यांच्यावर शंभर टक्के अतिरिक्त शुल्क आकारल्या जाईल अशी ही धमकी दिली. ब्राझील रशिया भारत हे ब्रिक्स संघटनेचे प्रमुख देश आहेत हे ब्रिक्स देश आपसातील आर्थिक व्यवहारासाठी एक वेगळे चलन ठरवण्याच्या विचारात आहेत.याचीही कूणकूण लागल्याने यामुळे आपल्या डॉलरचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन ट्रम्प यांनी ब्रिक्स संघटनेने वेगळे चलन निर्माण केल्यास संबंधित देशांची आर्थिक व्यवस्था डबघाईला आणू अशी धमकी दिली .

तसेच नाटो चे प्रमुख असलेले मार्क रुट्टे यांनीही भारताने रशियाशी व्यापार करु नये, तसेच रशियाचे युक्रेंनशी असलेले युद्ध थांबवण्यासाठी रशियावर दबाव आणावा असे म्हटले आहे. आणि तसे न केल्यास त्यांचेवर अतिरिक्त आयात शुल्क आकारला जाईल अशी धमकी दिली आहे. नाटो हे ३५ राष्ट्राचे संघटन असल्याने ही धमकी ३५ राष्ट्रांतर्फेच आहे असे मानल्यास वावगे ठरू नये.

या पार्श्वभूमीवर मार्क रुटे यांच्या धमकीवर प्रतिक्रिया देताना भारताने आपल्या देशासाठी व देशातील नागरिकांसाठी जे हिताचे ठरेल तसा व्यापार केल्या जाईल असे स्पष्ट केले. वास्तविक पाहता भारत रशियाकडून तीन महिन्यात जेवढे तेल खरेदी करतो तेवढे तेल युरोपीय देश एका दिवसात खरेदी करतात.अशी चर्चा आहे. मात्र अमेरिका व मार्क रुटे भारताला टारगेट करीत आहेत. हे सर्व भारताने रशियाशी व्यापार करू नये यासाठी वापरण्यात येत असलेले दबाव तंत्र आहे हे स्पष्ट होते.

 

” रीक “च्या पुनरुज्जीवनाचा मनोदय

या पार्श्वभूमीवर रशियाने पूढाकार घेवून रीक ट्रोईकाला पुनर्जीवित करून सक्रिय करण्याचा मनोदय जाहीर केला. त्या संदर्भात भारत व चीनशी बोलणी सुरू असल्याचेही म्हटले आहे. चीन ने ही रशिया, भारत व चीन यांचा त्रिपक्षीय सहयोग या देशांच्या तसेच क्षेत्र व जागतिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा व अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून एक प्रकारे भारताला निमंत्रण व रशियाच्या सूचनेचे समर्थन केले आहे.

पश्चिमेकडील राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून जागतिक राजकारणात एकटा परंतु सैनिक दृष्ट्या समर्थ असलेला रशिया, आर्थिक व्यवहारातून आपला दबाव निर्माण करणारा चीन, आणि वेगाने वाढणारी आर्थिक अर्थव्यवस्था असणारा भारत यांचा एकत्रित संघ पून्हा सक्रीय झाल्यास अमेरिकेसाठी प्रबळ प्रतिस्पर्धी निर्माण होईल .या संभाव्य भीतीमुळेच भारताला धमकावून या संभाव्य संघटनेपासून दूर ठेवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.

रीक ट्रोईका संघटना पुनर्जीवित झाल्यास खालील प्रकारचे संभाव्य फायदे होण्याची शक्यता आहे.

१) रशिया भारत व चीन राष्ट्रीय एकत्र आल्यास बहुपक्षीय संवादाचे व्यासपीठ तयार होऊन द्विपक्षीय हिताऐवजी त्रिपक्षीय हित जोपासता येईल अशी शक्यता आहे.

२) तीन राष्ट्रांच्या एकत्रित गुंतवणूक व व्यापारीक धोरणामुळे आर्थिक सहकार्य वाढेल. विशेषतः ऊर्जा तंत्रज्ञान इन्फ्रास्ट्रक्चर आदी क्षेत्रात संयुक्त प्रकल्पांना उत्तेजन मिळण्याची शक्यता आहे.

३) या राष्ट्रांच्या माध्यमातून बहुधृवीय जागतिक व्यवस्था निर्माण होऊ शकते. तसेच संयुक्त राष्ट्र संघा च्या सुधारणेसाठी सहकारी ठरू शकते.

४) रिकच्या पुनरुज्जीवनाने ब्रिक्स व शांघाय सहकार्य संघटना अधिक प्रभावी होण्यास मदत होऊ शकते.

मात्र या सोबत भारतासाठी काही प्रकारचे तोटे सुद्धा होण्याची शक्यता आहे.

१) भारत, रशिया चीन यांच्या एकत्रित संघटनेमुळे रशिया व चीन मधे सहकार्य वाढून भारत चीन सीमा प्रश्नासाठी ते घातक ठरू शकते.

२) वैचारिक धोरणात्मक विरोधाभास- भारताचे पश्चिम राष्ट्रातील असलेले संबंध धोक्याची येण्याची शक्यता आहे. रीक मध्ये भारत रशिया चीन एकमेकांशी सहकार्यासाठी बद्ध असतील तर अमेरिके सोबत भारत क्वाडमधे असून इंडो पॅसिफिक महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे हा क्वाडचा उद्देश आहे. एकाच वेळी चीनला सहकार्य करणे व त्याच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे या वैचारिक विरोधामुळे कोणत्यातरी एका संघटनेत भारताचे सहकार्य मर्यादित होऊ शकते.

३) त्रिपक्षीय संघटनेत रशिया चीनच्या वाढत्या लष्करी व आर्थिक सामर्थ्या मुळे निर्णय प्रक्रियेत त्यांचा प्रभाव राहून भारतासाठी ते धोक्याचे ठरू शकते.

मात्र हे संघटन पूनरज्जीवित होवून सक्रिय होण्यास खालील प्रमुख अडचणी आहेत या अडचणीवर तोडगा निघाल्यासच हे संघटन होण्याची शक्यता आहे.

अडचणी

१) हे संघटन निर्माण होण्यास प्रमुख अडचण म्हणजे चीनचा विश्वासघातकी स्वभाव व त्याचे विरोधी धोरण. भारत एक वेळेस रशियावर विश्वास ठेवू शकतो, कारण रशिया भारताचा जुना मित्र आहे. मात्र चीन संदर्भात भारताला नेहमीच विश्वासघतकी पणाचा अनुभव आलेला आहे. 1962 युद्धाचा अनुभव,बळकावलेला अक्साई, सतत अरुणाचल प्रदेशाबद्दल निर्माण करीत असलेला सीमावाद, भारता शेजारील नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान आदी राष्ट्रांना भारत विरोधात चिथावणी देऊन सतत भारत विरोधात सहकार्य करणे, भारत वगळून शेजारील राष्ट्राची सार्क संघटना निर्मितीचा प्रयत्न, भारत पाक संघर्षामध्ये पाकिस्तानला शस्त्रासह मदत करणे, अशा कितीतरी विश्वासघातकी घटनांचा अनुभव भारतासमोर आहे. यामुळे चीन कितपत बदलला व चीनवर कितपत विश्वास ठेवावा यावरच भारताचे रिक मध्ये सामील होणे अवलंबून असेल. शेवटी राजकारणात काहीही घडवू शकते.

२) जागतिक राजकारणाच्या संदर्भात भारत आजपर्यंत कोणत्याही गटात सामील न राहता भारताचे धोरण तठस्थतेचे राहिले आहे. परंतु या त्रिपक्षीय संघटनेत सामील झाल्यास भारताचा हा तटस्थपणा अडचणीत येऊ शकतो.

३) भारत इजराइल संबंधावर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

एकंदरीत रीक चे पुनरुज्जीवन अमेरिकेच्या जागतीक प्रभावाला एक समर्थ पर्याय ठरून एक जागतिक समांतर सत्तासंरचना उभी राहू शकते. परंतु त्यासाठी चीन भारत व रशिया यांच्यात परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे.

भालचंद्र पांडुरंग ठोंबरे

९८३४३५०८९५

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 2 9 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे